
शासनाने स्वस्त धान्य दुकानदारांना दिल्लीतील एनआयसी कंपनीमार्फत 2017मध्ये धान्यवाटपासाठी दिलेल्या ‘टूजी’ सिस्टीम असलेल्या ‘ई-पॉस’ मशिन कालबाह्य झाल्या आहेत. त्यामुळे त्याद्वारे ग्राहकांच्या अंगठा अथवा बोटाचा ठसा घेऊन धान्यवाटप करण्याच्या कामात वारंवार अडचणी येत आहेत. परिणामी, मागील सात-आठ दिवसांपासून संपूर्ण राज्यातील स्वस्त धान्यवाटप ऐन सणासुदीच्या दिवसात बंद आहे.
केंद्र शासनाने संपूर्ण देशातील रेशनिंग व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल करून दुकानदारांना ग्राहकांच्या अंगठा अथवा बोटाचा ठसा ई-पॉस मशिनवर घेऊन त्याद्वारे धान्यवाटप करण्याची प्रक्रिया 2017पासून सुरू केलेली आहे. या कामासाठी एनआयसी नवी दिल्ली या कंपनीकडून ई-पॉस मशिन दुकानदारांना दिलेल्या आहेत. त्याच्या देखभाल व दुरुस्तीसाठी बंगळुरूतील इटेगरा कंपनीला काम देण्यात आले आहे. या कामांचे संपूर्ण पैसे केंद्र शासनाने या कंपनीला देऊन त्यांच्यावर यासंदर्भात जबाबदारी दिलेली आहे.
परंतु त्या काळात ‘टूजी’ सिस्टीम सुरू असल्यामुळे या मशिनमध्ये टूजी सिस्टीमचे सिम टाकून डाटा अपडेट केलेला आहे; परंतु 2017पासून पुढे एक ते दोन वर्षे 2019 ते 2020 पर्यंत मशिन व्यवस्थित कार्यरत होत्या व नेटवर्कसद्धा चांगले मिळत होते; परंतु आता देशात ‘फोरजी ’सिस्टीम सुरू झाली असून, पुढील काळात ‘फाइव्हजी’ येणार आहे. सध्या दुकानदारांकडे असलेल्या ई-पॉस मशिनमध्ये ‘एनआयसी’कडून नवीन नवीन सॉफ्टवेअर अपडेट करण्यास सांगितले जाते. त्याचा परिणाम दोन तीन महिने दिसतो. नंतर पुन्हा मशिन बंद पडते. यामुळे ग्राहकांना व दुकानदारांना नाहक त्रास होत असून, रेशन कार्डधारकांना चार-पाच वेळा स्वस्त धान्य दुकानांत चकरा माराव्या लागतात.
ग्रामीण भागातील स्वस्त धान्य दुकानात मागील मे महिन्याचे धान्य येऊन पडले असले, तरी त्या धान्याचे वाटप दुकानदारांना करता येत नाही. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी कार्डधारकांकडून होत आहे.
यंत्रातील दोष दूर झाल्याशिवाय धान्यवाटप नाही
तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना कार्डधारकांकडून रोज विचारणा होत आहे; पण तालुक्यातील दुकानात धान्य दुकानदारांनी धान्य घेऊनदेखील वाटप करता येत नाही. त्यातच कार्डधारकांनादेखील रोज तोंड द्यावे लागत आहे. ई-पॉस मशिनवर ग्राहकांचा अंगठा अथवा बोटाचा ठसा घेतल्याशिवाय धान्य देता येईना. ठसा न घेता धान्यवाटप केले तर उद्या कोणीही धान्य मिळाले नसल्याची तक्रार करू शकतो. त्यामुळे ई-पॉस मशिन सुरू होईपर्यंत तरी धान्यवाटप होणार नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
हा तांत्रिक प्रश्न सगळीकडेच येत आहे. वरील पातळीवर याबाबत काम सुरू आहे. काम लवकर पूर्ण होऊन साधारणपणे दोन ते तीन दिवसांत ई-पॉस मशिन व्यवस्थितरीत्या पूर्ववत सुरू होतील. नेवासा तालुक्यातील जवळपास सर्वच स्वस्त धान्य दुकानांत धान्य आलेले आहे. त्यानंतर लगेच तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार स्वस्त धान्य कार्डधारकांना धान्यवाटप सुरू करतील.
– रूपेशकुमार सुराणा, तहसीलदार, नेवासा.



























































