रत्नागिरी – पहिल्या दिवशी 1774 जणांनी घेतली लस, 15 ते 18 वयोगटातील तरुणांसाठी लसीकरण सुरु

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

15 ते 18 वयोगटातील तरुणांचे कोविड 19 लसीकरण आजपासून सुरु झाले. आज पहिल्या दिवशी जिल्ह्यातील 15 ते 18 वयोगटातील 1774 जणांनी लसीकरणाचा लाभ घेतला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या हस्ते कोकणनगर येथील लसीकरण केंद्रात 15 ते 18 वयोगटातील तरुणांच्या लसीकरणाचा शुभारंभ झाला. आठवड्यातून बुधवार आणि शनिवार या दोन दिवशी 15 ते 18 वयोगटातील लसीकरण होणार आहे.

यावेळी डॉ. अनिरुद्ध आठल्ये म्हणाले की, लसीकरणाचे नियोजन कार्यक्षेत्रातील शाळा व महाविद्यालये येथे केल्यास लसीकरणाला गती मिळेल. 15 ते 18 वयोगटासाठी कोवॅक्सीनची लस दिली जाणार आहे. यावेळी वैद्यकिय अधिकारी डॉ. एम. एम. सूर्यवंशी, डॉ. परिमल गोडे, डॉ. सुधीर भुसाने आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

आज पहिल्या दिवशी जिल्ह्यात 19 सत्रामध्ये 1774 जणांनी लसीकरणाचा लाभ घेतला, त्यामध्ये मंडणगड 201 लाभार्थी दापोली 345 लाभार्थी, खेड 60 लाभार्थी, गुहागर 255 लाभार्थी चिपळूण 105 लाभार्थी, संगमेश्वर 481 लाभार्थी, रत्नागिरी 101 लाभार्थी. लांजा 60 लाभार्थी आणि राजापूरमध्ये 158 लाभार्थी होते.