रत्नागिरी जिल्ह्यातील 104 ग्रामपंचायतीच्या इमारती धोकादायक, गावचा विकास करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या इमारतीसाठी निधी नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गावाच्या विकासात महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींचा कारभार आजही जुन्या इमारतीतून सुरू आहे. त्यापैकी अनेक इमारती धोकादायक असून दुरूस्तीची किंवा नूतनीकरणाची गरज आहे. जिल्ह्यातील 104 ग्रामपंचायतींच्या इमारती धोकादायक बनल्या आहेत.

जिल्ह्यात 846 ग्रामपंचायती आहेत. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या धोकादायक बनलेल्या इमारतींकडे शासनाकडून गांभीर्याने पाहिले जात नाही. या ग्रामपंचपायतींच्या माध्यमातून गावात विविध योजना राबवण्यात येत आहेत.अनेक विकास कामे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून होतात मात्र गावचा विकास करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या इमारतीची अवस्था बिकट आहे. ग्रामपंचायतीच्या इमारतीकरिता निधी उपल्बध होत नाही.

जिल्ह्यातील 104 ग्रामपंचायतींच्या इमारती अनेक वर्षांपूर्वीच्या आहेत. या इमारती वापरणे अतिधोकादायक असल्याचा निष्कर्ष संबंधित विभागाकडून काढण्यात आला आहे. धोकादायक असलेल्या काही ग्रामपंचायतींच्या काही इमारतींचे छत कोसळले आहे. तर, काहींचे छप्पर दुरुस्ती करणे, स्लॅबना गळती, भिंतींना तडे गेले आहेत. लादी बसविणे, खिडक्या, दरवाजे दुरुस्ती करणे गरजेचे आहे.अनेक ग्रामपंचायतींच्या छपरांची अवस्था फार बिकट झाली आहे. त्यामुळे पावसाळा तर कसाबसा तग धरून काढावा लागतो. मोडकळीस आलेल्या ग्रामपंचायतींच्या कार्यालयामध्ये पावसाळ्यात कागदपत्रे भिजून खराब होत आहेत. त्यासाठी नवीन इमारतींची मागणीही ग्रामपंचायतींकडून करण्यात आलेली आहे.