
दुर्गेश आखाडे, इंदौर
रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी इंदौर कृषी महाविद्यालयात भेट देऊन तूरडाळ लागवडीचा अभ्यास केला आहे. इंदौर कृषी महाविद्यालयातील तज्ज्ञांकडून शेतकऱ्यांना प्रगत शेतीविषयी तसेच पाण्याची उपल्बधता कमी असताना पीकांचे नियोजन कसे करावे. अवकाळी पावसाने जेव्हा एखादे पीक वाया जाते तेव्हा त्यावेळी पडलेल्या अवकाळी पावसाचा उपयोग करून दुसरे पीक कसे घ्यायचे याचे धडे रत्नागिरीतील शेतकऱ्यांनी गिरवले. रत्नागिरी जिल्हा परिषद कृषी विभागाने शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा मध्यप्रदेश येथे आयोजित केली आहे.
या कृषी सहलीच्या पहिल्या दिवशी शेतकरी, अधिकारी वर्गाने इंदौर कृषी महाविद्यालयात भेट दिली. सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत कृषी महाविद्यालयात शेती तंत्रज्ञान, विविध पीकांची होणारी लागवड याविषयी वरिष्ठ तांत्रिक अधिकारी नरेंद्र सिन्हा यांनी माहिती दिली. नरेंद्र सिन्हा म्हणाले की, मध्यप्रदेश मध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे. सुमारे 950 मिमी पाऊस पडतो. त्यामुळे पाण्याचे नियोजन करून शेती केली जाते. बाजारात ज्या उत्पादनाला मागणी आहे त्या उत्पादनाला पुरक शेती करण्यावर येथील शेतकऱ्यांचा भर असतो. आपल्याला खाद्यतेल मोठ्या प्रमाणात लागते हे ओळखून इंदौर मधील शेतकरी सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणात करतो. इतर खाद्यतेलापेक्षा सोयाबीनचे तेल स्वस्त मिळते. त्याचबरोबर आम्ही गव्हाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात करतो. अवकाळी पाऊस पडल्यानंतर अनेक वेळा पीकाचे नुकसान होते. त्यावेळी शेतात पाणी साचते या साचलेल्या पाण्यांचा उपयोग करून बटाटा आणि कांद्याचे उत्पादन आम्ही घेत असतो असे सिन्हा म्हणाले. कृषी शास्त्रज्ञ डॉ. सत्यपाल सिंह यांनी इंदौर कृषी विद्यापीठातील कृषी तंत्रज्ञानाची माहिती दिली. कुसुम, करडई लागवडीची माहिती दिली. जेएसआय 97 जवाहर सेफ्लॉवर इंदौर ही करडईची जात विकसित करण्यात आली आहे. यावेळी रोहन बने, संतोष थेराडे, परशुराम कदम, महेश नाटेकर, चंद्रकांत मणचेकर, विनोद झगडे, अनंत करबेले, मुख्य लेखा अधिकारी ओंकार अंबपकर, शंकर भुवड, दीपक नागले, श्रीमंत बळीराजा बचत गटाचे अध्यक्ष चंद्रकांत बांबाडे, सदस्य रामचंद्र बांबाडे, कृषी विकास अधिकारी विजय पोकळे आणि शेतकरी उपस्थित होते.
तूर लागवडीचे तंत्रज्ञान जिल्ह्यात विकसित करणार!
इंदौर कृषी महाविद्यालयात तूर लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. या लागवडीची जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष पहाणी करत माहिती घेतली. जिल्हा परिषद कृषी विभाग रत्नागिरी जिल्ह्यात तूर लागवड करण्याचे तंत्रज्ञान विकसित करणार आहेत. तूरडाळीचा दैनंदिन जेवणात होणार वापर पाहिल्यास तूर उत्पादनाला मोठी बाजारपेठ आहे.
जे विकतं…तेच पिकतं !
पारंपरिक शेतीवर शेतकऱ्यांचा विश्वास होतो. रत्नागिरी जिल्ह्यातही भात,नाचणी,वरी सारखी पीके घेतली जातात. इंदौरच्या दौऱ्यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जे विकतं तेच पिकतं हा नवा मूलमंत्र मिळाला. बाजारात ज्या उत्पादनाला मागणी आहे त्या उत्पादनाचे पीक घेतल्यास त्यातून अर्थकरण निर्माण होते हा धडा शेतकऱ्यांनी गिरवला.
आम्ही संगमेश्वरात तूर लागवड करणार
आमच्या श्रीमंत बळीराजा बचत गटाने संगमेश्वर तालुक्यात शेतीचे विविध उपक्रम राबविले आहे. मोठ्या प्रमाणात जमिन लागवडी खाली आणली आहे. इंदौर मधील अभ्यास दौऱ्याचा आम्हाला फायदा झाला असून आम्ही संगमेश्वरात तूर लागवडीचे तंत्रज्ञान विकसित करणार आहोत.
– चंद्रकांत बांबाडे, अध्यक्ष, श्रीमंत बळीराजा बचत गट संगमेश्वर



























































