शिकारीसाठी गेलेल्या तरुणाचा बंदुकीची गोळी लागून मृत्यू

716

रत्नागिरीत शिकारीसाठी गेलेल्या युवकाला बंदुकीतून अचानक सुटलेल्या गोळीमुळे जीव गमवावा लागला. ही घटना मार्गताम्हाने महावितरण उपकेंद्रा शेजारील जंगलात बुधवारी सायंकाळी घडली. सिद्धेश संतोष गुरव असे या मयत तरुणाचे नाव असून तो एफवायबीएला शिकत आहे. शिकारीच्या प्रकरणात पोलीसांनी दोन तरुणांना संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी सिद्धेश गुरव आपल्या मित्रांसोबत सायंकाळी 4 वाजता शिकारीसाठी बाहेर पडला. देवघर ते मार्गताम्हाने दरम्यान महावितरण उपकेंद्राशेजारील जंगलात ते गेले होते. तेथे बंदुकीची गोळी लागून सिद्धेश जागीच ठार झाला. त्यामुळे अन्य सहकार्‍यांनी तेथून पळ काढला. रात्री 8 वाजता गुहागर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाने फोन करुन जंगलात तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती दिली. या माहितीच्या आधारे गुहागर पोलीसांनी जंगलात शोध घेवून मृतदेह शोधला. डाव्या हाताच्या चिंधड्या झालेल्या आणि बंदुकीची गोळी डोक्यात शिरलेला मृतदेह पोलीसांना सापडला. तातडीने श्वानपथक पाचारण करण्यात आले. पंचनाम्यासोबत मार्गताम्हाने गावात तपासाला सुरवात झाली. पोलीसांनी अग्नेश चव्हाण आणि यश पोतदार अशा दोन तरुणांना ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरु आहे.

आपली प्रतिक्रिया द्या