
मासेमारी करून परत मिरकरवाडा बंदरात येणारी ‘अमीन आएशा’ ही मच्छिमार नौका बुडाल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. या नौकेवर एकूण आठ खलाशी होते. त्यापैकी सहा जण सुखरूप बचावले असून दोन जण बेपत्ता होते. बेपत्ता दोघांपैकी एकाचा मृतदेह सापडला आहे. दुसरा अद्याप बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे.
अमीन आएशा ही नौका मासेमारी करून परतत असताना लाटेचा तडाखा बसल्याने समुद्रात बुडाली. दुर्घटनेनंतर बोटीवरील सहा खलाशांनी पोहत किनारा गाठण्याचा प्रयत्न केला. यावेळी दुसरी स्थानिक मच्छिमार नौका मदतीला धावून आल्याने सहाही जण सुखरूप बचावले आहेत. तर दोन जण बेपत्ता होते. त्यापैकी एकाचा मृतदेह दुपारी 3 वाजता मिऱ्या समुद्रकिनारी सापडला. स्थानिक मच्छिमारांनी मृतदेह बाहेर काढला. विनोद धुरी असे मयत खलाशाचे नाव आहे.