
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील देवीहसोळ गावामध्ये नदीकिनाऱ्यालगत एका स्थानिक ग्रामस्थाच्या मालकीच्या माडाच्या बागायतीमध्ये फासकीमध्ये अडकलेल्या बिबटयाच संशयास्पद मृत्यु झाल्याची घटना घडली असून या मृत बिबट्याची शिकार करून त्या मृत बिबट्याला नदीमध्ये फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या बिबट्याचा मृतदेह आता सडण्याची प्रक्रिया सुरू झाली असून एवढे होऊनही याबाबत कुणीच माहिती न दिल्याने या बिबट्याच्या मृत्यु प्रकरणात संशय वाढला आहे. सोशल मिडियावर याबाबची माहिती व्हायरल झाल्यानंतर आता वनविभागाला जाग आली असून वनविभागाचे अधिकारी 6 डिसेंबरला सायंकाळी घटथस्थळी रवाना झाले . मात्र अशा प्रकारे या बिबटयाला फासकीत मारणाऱ्यांचा वनविभाग व पोलीसांनी कसून शोध घ्यावा व कडक कारवाई करावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ व प्राणी प्रेमींकडून होत आहे.
या प्रकरणी वनविभागाने सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशा प्रकारे बागेत बिबट्या फासकीत अडकलेला असताना बाग मालकांनी का कळविले नाही, स्थानिक पोलीस पाटील यांनीही याबाबत काहीच माहिती का दिली नाही असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. तर बिबटया या संरक्षित प्राण्याबाबत एवढी बेफिकीरी कशी काय? असाही सवाल उपस्थित केला जात आहे. वनविभागाकडून तपास सुरू असल्याचे तसेच या प्रकरणी पंचनामा करून योग्य ती कारवाई केली जाईल असे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे.



























































