
चिपळूण तालुक्यातील ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेल्या परशुराम डोंगर परिसरात बुधवारी सायंकाळी भीषण वणव्याने थैमान घातले आहे. या आगीत मोठ्या प्रमाणात जंगल पेटल्याने संपूर्ण परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरले असून, दूरवरूनही धूर स्पष्टपणे दिसत आहे.
या वणव्यामुळे शेकडो झाडे, झाडीझुडपे, गवत तसेच मौल्यवान वनसंपदा जळून खाक झाली आहे. परिणामी या परिसरातील जैवविविधतेला मोठा फटका बसला असून, वन्यजीवांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, वारंवार लागणाऱ्या वणव्यांमुळे निसर्गाचा होत असलेला ऱ्हास पाहता निसर्गप्रेमी आणि पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. वणवे रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी यावेळी नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच, या आगीमागील नेमकी कारणे शोधून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशीही मागणी पुढे येत आहे.



























































