
मुलगा हवा होता पण मुलगी झाल्याने नाराज मातेने स्वतःच्याच एक महिन्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या मातेला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अतिरिक्त सत्र न्यायालय चिपळूण येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. अनिता एस. नेवसे यांनी आरोपी महिलेला जन्मठेप आणि 25 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. शिल्पा प्रविण खापले असे आरोपी मातेचे नाव आहे.
शिल्पा खापले ही पती, दोन मुली आणि सासू-सासऱ्यांसोबत चिपळूण तालुक्यातील वहाळ, घडशीवाडी येथे राहत होती. शिल्पाला पहिली मुलगी होती आणि दुसऱ्यांदा मुलगा व्हावी अशी अपेक्षा होती. मात्र तिला दुसऱ्या वेळीही मुलगीच झाल्याने ती नाराज होती. यातूनच 5 मार्च 2021 रोजी घरी कुणीही नसल्याची संधी साधून शिल्पाने आपल्या एक महिन्याच्या लहान मुलीला पाण्याने भरलेल्या बादलीत बुडवले.
शेजारी आल्यानंतर तिने मुलगी बेशुद्ध पडल्याचा बनाव केला. सुरुवातीला सावर्डे पोलिसांनी आस्कमिक मृत्यू नोंद करुन चौकशी केली. परंतु, गुन्ह्याची सर्व परिस्थिती व एकूण पार्श्वभूमी विचारात घेवून मुलीची हत्याच झाली आहे, असे निष्पन्न झाले. यानंतर भा.द. वि. कलम 302 अन्वये सुरुवातीस अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु पोलीस उपअधिक्षक सचिन बारी यांनी या गुन्ह्याचा सखोल तपास करुन आरोपी माता शिल्पा प्रविण खापले हिनेच हत्या केल्याचे तपासाअंती निष्पन्न झाल्याने तिच्या विरुध्द आरोपपत्र दाखल केले.
या खटल्याची सुनावणी चिपळूण येथील जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता श्रीरंग नेवसे यांच्या समोर झाली. सरकार पक्षातर्फे अॅड. अनुपमा ठाकूर यांनी आरोपीचा गुन्हा सिद्ध करण्याकरीता एकूण 15 साक्षीदार तपासले. अभिलेखावरील सरकार पक्षाचा एकंदरीत साक्षीपुरावा, वैद्यकीय अधिकारी, पोलीस अधिकारी, शेजारी राहणाऱ्या साक्षीदारांनी दिलेली महत्वपूर्ण साक्ष व सखोल युक्तीवाद ग्राह्य धरुन सत्र न्यायाधीश डॉ. अनिता श्रीरंग नेवसे यांनी आरोपीस दोषी ठरवले. आरोपीविरोधात भा.द.वि कलम 302 अन्वये आजन्म कारावास आणि 25 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.