Ratnagiri News – शिवसेनेच्या आंदोलनाच्या इशाऱ्याने कॅनिंग कंपन्या नरमल्या; आंब्याच्या दरात किलोमागे 5 रुपयांची वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कॅनिंग कंपन्यांनी आंब्याचे दर 50 टक्क्यांनी कमी केल्याच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आंदोलनाचा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर कॅनिंग कंपन्यांनी आंब्याच्या दरात प्रतिकिलो पाच रुपयांची वाढ केली आहे.

हवामानातील बदलांमुळे आंबा बागायतदार आधीच संकटात असताना कंपन्यांनी दर घटवल्याने शिवसेना उपनेते बाळ माने यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. गुरुवारी शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांना यासंदर्भात निवेदनही देण्यात आले होते. शिवसेनेच्या या ठाम भूमिकेमुळे कंपन्यांनी दरात सुधारणा केली आहे.

कंपन्यांनी पाच रुपयांची वाढ केली असली, तरी बागायतदारांना प्रतिकिलो 75 रुपये दर मिळावा, अशी मागणी बाळ माने यांनी केली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास 15 मे रोजी आंबा बागायतदारांचा मोर्चा काढला जाणार असून, 17 मे रोजी जिल्ह्यातील मोठ्या आंबा प्रक्रिया कारखान्यांवर (फॅक्टऱ्यांवर) धडक मोर्चा नेण्याचा इशाराही माने यांनी दिला आहे.