
संगमेश्वर तालुक्यात नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. पैशासाठी मुलानेच जन्मदात्या पित्याचे अपहरण करून खंडणीची मागणी केली. मंगळवारी दुपारी 3.30 वाजता ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी देवरुख पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतले आहे. श्रीकांत दत्तात्रय मराठे असे आरोपी मुलाचे नाव आहे.
आरोपीची आई सुनीता मराठे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सेवानिवृत्त शिक्षक दत्तात्रय मराठे (80) यांना पेन्शन मिळते. पैशाच्या मागणीवरून आरोपी श्रीकांत वारंवार वाद घालायचा. सोमवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास श्रीकांतने आई आणि नातीसमोरच वडिलांच्या मानेवर सुरा ठेवत, “आता एक लाख रुपये द्या नाहीतर ठार मारतो” अशी धमकी दिली. त्यानंतर वडिलांना जबरदस्ती कपडे घालून टू-व्हिलरवर बसवून सह्याद्रीनगरच्या दिशेने पळून गेला.
पहाटेपर्यंत दोघांचा काहीच संपर्क न झाल्याने कुटुंब चिंतेत असतानाच सकाळी नात वेदांगीच्या मोबाईलवरून अपहरण झालेल्या वडिलांच्या मोबाईलवरून व्हॉटसअॅप कॉल आला. त्यात वडिलांचा हात-पाय आणि तोंड प्लॅस्टिक टेपने घट्ट बांधलेला फोटो दिसला. श्रीकांतने त्या फोटोसोबत एक लाख रुपये खंडणी मागितली आणि नकार दिल्यास “मी आता मागे हटणार नाही” अशी धमकी दिली.
या घटनेनंतर आई सुनिता मराठे यांनी धाडस दाखवत थेट देवरूख पोलीस ठाणे गाठले आणि मुलाच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्पर कारवाई करत चिपळूण परिसरातून श्रीकांत मराठेला ताब्यात घेतले. सध्या देवरूख पोलीस पुढील तपास करत आहेत. आरोपीवर खंडणी, अपहरण आणि जीवे मारण्याच्या धमकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.