रत्नागिरीत पावसाची रिपरिप; सिंधुदुर्गात संततधार

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार कोकणात तीन दिवसांत अनेक ठिकाणी दमदार पाऊस पडेल अशी शक्यता होती, मात्र रत्नागिरी जिह्यात आज दिवसभर बहुतांश भागात पावसाची केवळ रिपरिप पाहायला मिळाली, तर सिंधुदुर्गात पावसाचा जोर वाढला असून किनारपट्टी भागात मुसळधार तर अन्य काही भागात पावसाची संततधार कायम होती. मुसळधार पावसामुळे वेंगुर्ला तालुक्यातील होडावडा येथील पुलावर पाणी आल्याने येथील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

रत्नागिरी जिह्यात सोमवारी अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. दरम्यान, आज 22 जुलैपासून 25 जुलैपर्यंत जिह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील तीन दिवसांत पावसाचा जोर वाढू शकतो. गेल्या 24 तासांत जिह्यात सरासरी 32.94 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामध्ये मंडणगड – 47.00 मिमी, खेड – 23.42 मिमी, दापोली – 37.28 मिमी, चिपळूण – 22.44 मिमी, गुहागर – 27.20 मिमी, संगमेश्वर – 39.50 मिमी, रत्नागिरी – 25.66 मिमी, लांजा – 36.60 मिमी, राजापूर – 37.50 मिमी पाऊस पडला.