
मुख्यमंत्री कार्यालयाचे समन्वयक म्हणून आमदार रवींद्र वायकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकप्रतिनिधी आणि राज्यातील सर्वसामान्य लोकांशी संबंधित विषयांचा मुख्यमंत्री कार्यालयाशी समन्वय ठेवण्याची जबाबदारी रवींद्र वायकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
मागील सरकारमध्ये आमदार रवींद्र वायकर यांच्यावर गृहनिर्माण राज्यमंत्री पदाची जबाबदारी होती. मुंबईच्या खासकरून गृहनिर्माण तसेच महापालिकेच्या विषयात त्यांचा गाढा अभ्यास आहे. मुंबई महानगरपालिकेत 20 वर्षे नगरसेवक म्हणून काम करताना चार टर्म त्यांनी स्थायी समिती पद भूषवले आहे. मुंबईशी संबधित प्रश्न सोडवण्यात त्यांना अनुभव आहे. मागील तीन टर्मपासून आमदार म्हणून त्यांची कामगिरी चांगली आहे. त्यामुळे त्यांचा कामाचा अनुभव लक्षात घेऊन मुख्यमंत्री कार्यालयात येणाऱया लोकांशी समन्वय ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.





























































