
सामना प्रतिनिधी । मुंबई
मुसळधार पावसामुळे राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे इंजिनीअरिंग व वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेश प्रकियेस तत्काळ मुदतवाढ द्यावी अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या (सीईटी) आयुक्तांना दिल्या.
कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. नद्यांना पूर आला आहे. रस्ता वाहतूक, रेल्वे वाहतूक बंद आहे. अनेक ठिकाणी रस्तेही खचले आहेत. कोकणातील चिपळूण, संगेमश्वर, खेड, लांजा, राजापूर या भागांतील विद्यार्थ्यांना पुणे, कोल्हापूर, सातारा येथे इंजिनीअरिंग व वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा होता, परंतु कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थितीमुळे ते अशक्य होत आहे.
विद्यार्थ्यांना 7 व 8 ऑगस्ट रोजी प्रवेश घ्यायचा होता, परंतु त्यांना ते शक्य झालेले नाही. यामुळे त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ शकते. या विद्यार्थ्यांनी रत्नागिरी जिह्याचे पालकमंत्रीही असलेले रवींद्र वायकर यांना मुदतवाढ देण्याची विनंती केली होती. त्यानुसार या दोन्ही अभ्यासक्रमांबरोबरच इतर अभ्यासक्रमांचे शैक्षणिक वर्ष 2019-20 मधील प्रवेश प्रक्रियेतील पुढील टप्प्यातील प्रवेश प्रक्रियेस विद्यार्थ्यांना तत्काळ मुदतवाढ द्यावी, अशा सूचना वायकर यांनी दिल्या.






























































