
भेडसावणाऱया पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकरच सुटणार आहे. मुंबई महानगरपालिकेतर्फे आरेतील युनिट क्रमांक 30 येथे 70 हजार लिटर्सची पाण्याची टाकी बांधण्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राअंतर्गत आमदार रवींद्र वायकर यांच्या प्रयत्नांमुळे रहिवाशांच्या पाणी प्रश्नावर कायमचा तोडगा निघाला असून रॉयल पाम येथे असोसिएशनच्या माध्यमातून ही पिण्याच्या पाण्याची टाकी बांधण्यात येणार आहे. या टाकीच्या बांधकामासाठी आमदार वायकर यांच्या आमदार निधीतून 25 लाख रुपये देण्यात येणार आहेत.
जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राअंतर्गत येणाऱया पी दक्षिण विभागातील प्रलंबित विकास कामांचा आढावा घेण्यासाठी आमदार वायकर यांनी नुकतीच मुंबई महानगरपालिकेच्या पी दक्षिण विभागीय कार्यालयात बैठक घेतली होती. या बैठकीला संबंधित अधिकाऱयांसह महिला विभाग संघटक शालिनी सावंत, माजी नगरसेविका रेखा रामवंशी, विधानसभा समन्वयक भाई मिर्लेकर, उपविभागप्रमुख जितेंद्र वळवी, शाखाप्रमुख बाळा तावडे, संदीप गाढवे, राहुल देशपांडे, अपर्णा परळकर, पुजा शिंदे, वैभव कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पाण्याच्या टाकीबरोबरच गोकळुधाम ते साईबाबा कॉम्प्लेक्स टाकण्यात येणाऱया मलःनिस्सारण वाहीनीच्या कामाचा वेग वाढवून हे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करावे, अशा सूचनाही वायकर यांनी पालिका अधिकाऱयांना दिल्या.
बैठकीत आमदार वायकर यांनी मागील प्रलंबित कामांचा आढावा घेतला. यात आरे भास्कर ते गोकुळधाम येथील रस्ता सीसी करणे, गोकुळधाम येथील ज्येष्ठ नागरीक समाजमंदिर व पोलीस चौकी स्थलांतरीत करणे, महानंदा डेअरी ते वनराई वसाहतपर्यंत बाजूला असलेल्या पादचारी पुलाच्या बाजुला असलेला सर्व्हिस रोड खुला करुन रुंदीकरण करणे, सीसी कॅमेरे बसविणे, अनधिकृत फेरीवाल्यावर प्रभावी कारवाई करणे, बिंबीसारनगर येथील अंतर्गत रस्त्यावरील अनधिकृत टपऱया निष्कासित करणे अशा सूचना वायकर यांनी यावेळी दिल्या.
























































