
ओमायक्रोनमुळे नव्याने उभे राहिलेले संकट आणि महागाईचा वाढता आलेख या पार्श्वभूमीवर व्याजदरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. आरबीआयच्या चलनविषयक समितीने बुधवारी द्वैमासिक पतधोरण जाहीर केले. ज्यात रेपो दर 4 टक्के आणि रिव्हर्स रेपो 3.35 टक्क्यांवर कायम ठेवला आहे.
गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, बँकेने सलग नऊ वेळा व्याजदर स्थिर ठेवले आहेत. रेपो आणि रिव्हर्स रेपो दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. म्हणजेच आता कर्जाच्या दरात कोणतीही सवलत मिळणार नाही आणि तुमच्या गुंतवणुकीवर अधिक व्याज मिळण्याची शक्यताही कमी झाली आहे.
मार्चनंतर महागाई कमी?
महागाई आमच्या आधीच्या अंदाजानुसार आहे. रब्बी पीक चांगले आल्याने भाव आणखी खाली येतील. भाज्यांचे दरही खाली येऊ शकतात. या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत जानेवारी-मार्च महिन्यात महागाई वाढू शकते आणि त्यानंतर ती कमी होईल, असा आशावाद दास यांनी व्यक्त केला.




























































