
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने पहिल्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर काढण्यात आलेल्या विजयी परेड दरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी झाली झाली. या संदर्भात आता कर्नाटक सरकारने उच्च न्यायालयामध्ये एक विस्तृत अहवाल सादर केला आहे. चिन्नास्वामी मैदानाबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीला पूर्णपणे आरसीबी फ्रेंचायझी जबाबदार असल्याचे सरकारने आपल्या अहवालात म्हटले आहे. तसेच या अहवालात आरसीबीचा माजी कर्णधार आणि स्टार खेळाडू विराट कोहली याच्या नावाचाही उल्लेख करण्यात आला आहे.
केंद्रीय प्रशासकीय प्राधिकरणानेही 4 जून रोजी चिन्नास्वामी मैदानाबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीसाठी आरसीबीला जबाबदार धरले होते. चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला होता. आरबीसीने पोलिसांची कोणतीही परवानगी न घेता सोशल मीडियावर अचानक ‘व्हिक्टरी परेड‘ची घोषणा केली होती. यामुळे लाखो लोक चिन्नास्वामी मैदानाबाहेर जमले होते. यावेळी अत्यंत निष्काळजीपणा करण्यात आला.
आरसीबी प्रशासनाने आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर 3 जून रोजी पोलिसांशी संपर्क साधला होता. पोलिसांना संभावित व्हिक्टरी परेडबाबत माहिती देण्यात आली. ही फक्त सूचना होती, कायद्याने कोणतीही परवानगी मागण्यात आली नव्हती. कारण अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी किमान 7 दिवस आधी परवानगी घेणे आवश्यक असते, असे कर्नाटक सरकारने आपल्या अहवालात म्हटले.
व्हिक्टरी परेड दरम्यान अत्यंत निष्काळजीपणा झाला. योग्य व्यवस्थाही नव्हती. कार्यक्रमाचे आयोजन करणारी कंपनी डीएनए नेववर्क प्रायव्हेट लिमिटेडने 3 जून रोजी पोलिसांना फक्त माहिती दिली होती, परंतु 2009 च्या आदेशानुसार कायदेशीर परवानगी घेतली नव्हती. घटना टाळण्यासाठी पोलिसांनी मर्यादित कार्यक्रमाची परवानगी दिली होती. परंतु अपेक्षेपेक्षा जास्त लोक कार्यक्रमाला पोहोचले, असे अहवालात नमूद करण्यात आले. तसेच आरसीबीने केलेल्या ट्विटचा उल्लेखही केला.
विराट कोहली हा आरसीबीचा अनुभवी खेळाडू असून तो मुख्य चेहराही आहे. आरसीबीने 4 जूनच्या कार्यक्रमाचे प्रमोशन करण्यासाठी विराट कोहली याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओद्वारे कोहलीने चाहत्याने कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते.



























































