IPL 2024 : विजयाचा षटकार अन् प्ले ऑफमध्ये धडक मारली; बंगळुरूचा चेन्नईवर थरारक विजय

अखेरच्या षटकापर्यंत श्वास रोखायला लावणाऱ्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नुसताच विजयाचा ‘घटकार’ ठोकला नाही, तर चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करून आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या प्ले ऑफमध्ये धडक दिली. कॅमेरून ग्रीन व ग्लेन मॅक्सवेल यांची अष्टपैलू चमक आणि ‘सामनावीर’ ठरलेला कर्णधार फाफ ड्युप्लेसीची अर्धशतकी खेळी ही बंगळुरूच्या विजयाची प्रमुख वैशिष्ट्ये ठरली.

बंगळुरूने चेन्नईपुढे विजयासाठी 219 धावांचे लक्ष्य दिले असले, तरी चेन्नईला प्ले ऑफ गाठण्यासाठी २०१ धावांची गरज होती. विजय त्यांच्यासाठी महत्त्वाचा नव्हता. बंगळुरूला विजय तर हवा होता, पण तो 18 धावांच्या फरकाने पाहिजे होता. शेवटी बंगळुरूच्या मनासारखं घडलं आणि त्यांनी चेन्नईला 7 बाद 191 धावांवर रोखून विजयासह प्ले ऑफचे तिकीटही बुक केलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Marathi Fire (@marathifire)

चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड पहिल्याच चेंडूवर ‘गोल्डन डक’ आऊट झाला. मात्र, त्यानंतर रचिन रवींद्र (61), अजिंक्य रहाणे (33), रवींद्र जाडेजा (नाबाद 42) व महेंद्रसिंह धोनी (25) यांनी 201 धावांपर्यंत पोहोचण्यासाठी मैदानावर जीवाचे रान केले. मात्र, अखेरच्या षटकात 17 धावांची गरज असताना चेन्नईला 7 धावाच करता आल्या आणि त्यांचे प्ले ऑफचे स्वप्न धुळीस मिळाले. बंगळुरूकडून यश दयालने 2, तर ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद सिराज, लॉकी फर्ग्युसन व कॅमेरून ग्रीन यांनी प्रत्येकी एक बळी टिपला.

त्याआधी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 5 बाद 218 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. विराट कोहली (47) आणि कर्णधार फाफ ड्युप्लेसिस (57) यांनी 9.4 षटकांत 78 धावांची सलामी दिली. कोहलीने 29 चेंडूंत चार षटकारांसह तीन चेंडू सीमापार पाठविले, तर ड्युप्लेसिसने 39 चेंडूंत तीन षटकारांसह तितकेच चौकार लगावले. दरम्यान, तिसऱ्या षटकानंतर पावसामुळे काही वेळ खेळ थांबला तेव्हा बंगळुरूने बिनबाद 31 धावांपर्यंत मजल मारली होती.

मिचेल सॅण्टनरने कोहलीला डॅर्ली मिचेलकरवी झेलबाद करून ही जोडी फोडली. त्यानंतर 13 व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर सॅण्टनरनेच ड्युप्लेसिसला धावचीत केले. सलामीची जोडी तंबूत परतल्यानंतर रजत पाटीदार (41) व कॅमेरून ग्रीन (नाबाद 38) यांनी तिसऱ्या विकेटसाठी 28 चेंडूंत 71 धावांची वेगवान भागीदारी केली. यात पाटीदारने 23 चेंडूंत चार षटकारांसह दोन चौकार लगावले. ग्रीनने 17 चेंडूंत तीन षटकार व तीन चौकारांसह आपली नाबाद खेळी सजविली. शेवटी दिनेश कार्तिकने 6 चेंडूंत 14, तर ग्लेन मॅक्सवेलने 5 चेंडूंत 16 धावा करीत बंगळुरूला 200 धावांचा टप्पा ओलांडून दिला. चेन्नईकडून शार्दूल ठाकूरने 2, तर तुषार देशपांडे व मिचेल सॅण्टनरने 1-1 बळी टिपला.