
सामना ऑनलाईन । मुंबई
माहीम सार्वजनिक वाचनालयाने राज्य मराठी विकास संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या वाचन प्रेरणा दिनाच्या कार्यक्रमात मुलांसह ज्येष्ठ वाचकांनीही सहभाग घेतला. वाचनालयाने या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला होता. माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित हा दिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने माहीम सार्वजनिक वाचनालयात डॉ. कलाम यांची प्रतिमा, तसेच त्यांच्या ग्रंथसंपदेची मांडणी करण्यात आली होती.
विशेष म्हणजे, सलग सात तास आणि तीन सत्रांत हा कार्यक्रम रंगला. केवळ सर्वसामान्य वाचकच नव्हे; तर वाचनालयाच्या अभ्यासिकेत येणाऱ्या विद्यार्थ्यांनीही या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला. तसेच शिवाजी पार्क लायन्स क्लबच्या कर्णबधिर विद्यार्थ्यांनीही यावेळी काव्यवाचन केले.
ज्येष्ठ लेखक कुमार नवाथे व ज्येष्ठ वैज्ञानिक व लेखक डॉ. प्रबोध चोबे यांनी यावेळी त्यांच्या जीवनातील पुस्तकांचे स्थान या विषयावर श्रोत्यांशी सुसंवाद साधला. नीती पांगम, तिहाना प्रभाणे, स्पृहा नाईक, अद्वैत दामले, निष्ठा पांगम या शालेय विद्यार्थ्यांनी यावेळी विविध विषयांशी संबंधित वाचन केले. बालकलाकार अथर्व बेडेकर याच्यासह युवा पिढीचे प्रतिनिधी कुणाल पवार, गणेश करंबेळकर, हर्षल हजारी आदींनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला.






























































