
कोरोनावर मात करण्यासाठी रुग्णांना उपचारांसोबत आवश्यक असतो तो मानसिक आधार! त्यामुळेच अंधेरी पूर्व येथे सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये अद्ययावत उपचारांसोबत वाचन, खेळ आणि समुपदेशन अशा सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मुंबई महानगरपालिका आणि रवींद्र जोशी मेडिकल फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत पहिल्यांदाच रुग्णांसाठी विरंगुळाही असणारे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे.
मुंबईत कोरोनाच्या दुसऱया लाटेत रुग्णसंख्या वेगाने वाढत असताना रुग्णांना बरे होण्यासाठी उपचारांसोबत मानसिक आधाराचीही मदत व्हावी यासाठी नित्यानंद पालिका शाळेमध्ये अशा प्रकारचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या कोविड केअर सेंटरमध्ये 60 वर्षांखालील ज्यांना मधुमेह, हृदयरोग आणि इतर आजार नसणाऱया रुग्णांना पालिकेच्या माध्यमातून दाखल करून घेण्यात येणार आहे, अशी माहिती रवींद्र जोशी मेडिकल फाऊंडेशन आणि जनकल्याण सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष केळकर यांनी दिली. या ठिकाणी सुरुवातीला 30 जणांची व्यवस्था करण्यात येणार असून गरजेनुसार बेडची संख्या वाढवण्यात येणार आहे. या ठिकाणी नाश्ता, भोजन, चहापान व इतर व्यवस्था निःशुल्क पुरविण्यात येतील. त्यामुळे हे कोविड केअर सेंटर रुग्णांना फायदेशीर ठरणार असल्याचे केळकर म्हणाले.
समुपदेशन, स्पोर्ट थेरपी उपयुक्त ठरणार
या कोविड सेंटरमध्ये कोरोनाबाधितांना मानसोपचारतज्ञांकडून समुपदेशनही करण्यात येणार आहे. शिवाय या ठिकाणी रुग्णांच्या विरंगुळ्यासाठी पॅरम, बुद्धिबळ असे खेळही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विविध पुस्तके, दैनिके व वाचन साहित्य असेल. त्यामुळे समुपदेशन आणि स्पोर्ट थेरपीमुळे रुग्णांना कोरोनामुक्त होण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. या पेंद्राच्या निर्मितीसाठी केशवसृष्टी संस्थेचे सहकार्य लाभले आहे. शिवाय विलेपार्ले येथील संस्था उत्कर्ष मंडळ, लोकमान्य सेवा संघ, देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ व अनेक संस्थांनी मदत केली आहे.





























































