
मुलाखती…संजीवनी धुरी-जाधव
पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही… लहानपणापासून मनावर हेच ठसवलं गेलेलं… काही संस्कार हे लहानपणीच झाले की ते पक्के होतात… ज्या संस्कारांतून संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा पाया पक्का होतो, त्यापैकी वाचनसंस्कार हा सगळ्यात महत्त्वाचा… जो घडवण्यात आईचा, आजी-आजोबांचा वाटा फार मोठा असतो. आजच्या मोबाईल, संगणक, अनेक समाजमाध्यमांच्या सुळसुळाटात हा वाचनसंस्कार होणं फार गरजेचं आहे. आपली वाचनसंस्कृती अत्यंत समृद्ध आणि संपन्न आहे. चरित्रं, आत्मचरित्रं, कथा, कादंबऱया, ऐतिहासिक, वैचारिक… पौराणिक… राजकीय या सगळ्यांमधील अतिशय महत्त्वाची आणि संस्कारक्षम शाखा म्हणजे बालसाहित्य. कुसुमाग्रज, विंदांसारख्या सिद्धहस्त साहित्यिकांनी हे बालवाड्:मय सदाबहार, समृद्ध करून ठेवले आहे. रत्नाकर मतकरी, डॉ. विजया वाड यांनी हा संपन्न वारसा पुढे नेला आहे. पण आज खऱया अर्थाने बालसाहित्य निर्माण होते आहे का… निर्माण होत असले तरी बालांकडून ते वाचले जाते का…? आपल्या दिवाळी अंकांच्या संस्कृतीत किशोर, चंपकसारखे लहान मुलांसाठीही दिवाळी अंक निघायचे… आजही निघतात… पण विरळ होत जाणारी पृष्ठसंख्या, मधूनमधून डोकावणारी कृष्णधवल पानं, सकस वाड्:मयाचा अभाव… हे सारे कशाचे द्योतक आहे…? मुळात प्रश्न हा आहे की, आजची लहान मुलं वाचतात का…? पाहूया आजच्या वलयांकीत लहानांची वाचनाबद्दलची मतमतांतरे…

माझी आई मला गोष्ट सांगते….आभा बोडस
मला वाचायला प्रचंड आवडतं. पण ही आवड माझ्यामध्ये आली ती माझ्या आई-बाबांमुळे. माझी आई मला झोपताना नेहमी गोष्ट सांगायची. तिच्याकडून दरदिवशी वेगळी गोष्ट ऐकायला मिळायची आणि माझे बाबा मला जेवताना एक गोष्ट सांगायचे. त्यांच्यामुळे मी गोष्टीची पुस्तकं वाचायला लागले. त्यात रमायला लागले. आता मी सातवीला आहे. डोंबिवलीच्या विद्यानिकेतन शाळेत शिकत आहे. आधी मी अकबर-बिरबलच्या कथा, तेनालीराम, शूरकथा, अरेबियन नाईट्स ही गोष्टीची पुस्तकं मी भरपूर वाचली. याचप्रकारची पुस्तके वाचायचे, पण नंतर आईने वाचनाचे महत्त्व सांगितले. मला ती वेगवेगळी पुस्तकं आणून द्यायची. हे पुस्तक वाच हे छान पुस्तक आहे असे प्रोत्साहनही द्यायची. मग तेव्हापासून मी वाचायला लागले आणि हळहळू त्यात रमू लागले. आता पुस्तकं वाचते तेव्हा पुढे काय होतं या उत्सुकतेने ते भराभर वाचूनही काढते. नुकतंच मी ‘श्यामची आई’ पुस्तक वाचलं. ते वाचून आईचं आपल्या मुलांवर किती प्रेम असतं त्याची जाणीव झाली. तिच्या रागामागे दडलेलं प्रेमही लक्षात आलं. यात लक्षात राहिलेला प्रसंग म्हणजे श्यामची आई श्यामला पोहण्याची भिती वाटत असल्याने त्याच्यावर रागावते, त्याला फरफटत आणते आणि विहिरीत ढकलून देते. तो प्रसंग वाचून त्याच्या आईचा राग येतो पण पुढे त्याचा अर्थ कळतो. तिने ढकलल्यामुळे श्याम पोहायला शिकतो, त्याच्या मनातली भीती निघून जाते. सध्या मी सुधा मूर्तींचे ‘वाइज ऍण्ड अदरवाइज’ पुस्तक वाचायला घेतलं आहे. मला शिवाजी महाराजांबद्दल वाचायलाही फार आवडतं. मी पुस्तक वाचताना त्यातला बोध माझ्या आयुष्यात उतरवण्याचा प्रयत्न करते. आई मला खूप गोष्टी वाचून दाखवते. अजूनही मला कधीतरी कंटाळा आला तर माझी आई छान गोष्ट सांगते. तिसरीत असताना बाबांनी सांगितलेली बकासुराची गोष्ट अजूनही लक्षात आहे. कथा असो किंवा पटकथा माझी आई मला ते वाचून दाखवते, समजावते. तसेच माझे नकुशीचे दिग्दर्शक वैभव चिंचाळकर, संभाजी मालिकेचे दिग्दर्शक विवेक देशपांडे यांनीही मला पुस्तकं वाचायला सांगितली आहेत. दोघांमुळे आणखी प्रोत्साहन मिळाले. आता मी हळूहळू कथा वाचायला लागले. मला पु.लं.चं साहित्य वाचायचे आहे. आता त्यांचा अभ्यास करायचा आहे. पुस्तकं नसती तर आपल्याला इतिहास कळला नसता. चांगल्या गोष्टी वाचायला मिळाल्या नसत्या, वाचन झाले नसते तर शिकता आले नसते. त्यामुळे चांगल्या माहितीसाठी, चांगल्या ज्ञानासाठी आणि भविष्य उज्वल करायचे असेल तर वाचन गरजेचे आहे.
मला वाचायचा कंटाळा येतो…श्रीनिवास पोकळे
वाचन??… कधीकधीच वाचतो. वाचण्याचा फार कंटाळा येतो. पण मी पोकेमॉनच्या स्टोरीज आवडीने वाचतो. लिहायला आवडतं. मला गोष्टी वाचण्यापेक्षा ऐकायला आवडतात. अमरावतीच्या द्वारकानाथ अरोरा इंग्रजी शाळेत दुसरीला शिकतोय. अभ्यास करण्यासाठी शालेय पुस्तकं वाचतो बाकी अशी वेगळी पुस्तकं वाचायला फारसं आवडत नाही. आई मला खूप वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी सांगते. त्या ऐकून एकदम ताजातवाना होतो. आईने गोष्ट सांगितल्यावर डोळ्यासमोर चित्र उभं राहतं. ती गोष्ट सांगताना मी कान टवकारून ऐकतो. तिने सांगितलेली चिमणी-कावळ्याची गोष्ट मला आवडते आणि ती माझ्या चांगली लक्षात राहाते. ‘नाळ’ चित्रपटाची कथा मला दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यांचे सहाय्यक प्रविण आणि स्वप्नील दादाने वाचून दाखवली होती.

शनिवारी-रविवारी पुस्तकं वाचतो… आर्यन देवगिरी
गोष्टींची पुस्तकं वाचायला मला आवडतात. सुट्टीच्या दिवशी मी खेळतो, चित्र काढतो, अभ्यास करतो आणि आठवणीने गोष्टींचं पुस्तक वाचतो. माझ्या आवडतं पुस्तक पिनोक्कियो आहे. मी कांदिवलीच्या ऑक्सफर्ड पब्लिक शाळेत चौथ्या इयत्तेत आहे. शाळेत असलेल्या लायब्ररीच्या तासामुळे मला वाचायला आवडू लागले. आमच्या शाळेत वाचनाच्या तासाला तिथे बसून पुस्तकं वाचतो आणि घरीही पुस्तकं घेऊन येतो. पण तिथे पुस्तकांची निवड करता येत नाही. ते जे पुस्तक देतात ते मी वाचतो. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके वाचायला मिळतात. याच लायब्ररीच्या तासामुळे मला वाचनाची आवड निर्माण झाली. इंटरनेटवर वाचण्यापेक्षा मला पुस्तकं वाचायला आवडतात. पण कधीतरी इंटरनेटवरची माहिती वाचतो. माझी आई मला खूप गोष्टी सांगते, त्या ऐकायलाही मला आवडतात. पुस्तक वाचण्यापेक्षा मला तिने सांगितलेल्या गोष्टी जास्त आवडतात. अनेकदा त्या ऐकता ऐकता मी झोपून जातो. वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये मला गोष्टीचीच पुस्तकं वाचायला आवडतात. एखादी मालिका करायची असेल तर त्या मालिकेचं कथानक आई वाचून दाखवते, ती मला नीट समजावते. कारण तीच मला जास्त समजावून सांगू शकते. मला थोडं थोडं मराठी वाचता येतं. मला गोष्ट लिहायला आवडते. माझी आई मला एखादा विषय देते आणि त्याच्यावरुन गोष्ट लिहायला सांगते. त्यामुळे मोकळ्या वेळेत मी गोष्ट लिहितो. आईने विषय दिला की डोक्यात विचार सुरु होतात. मग काही ऐकलेले, वाचलेले अशावेळी उपयोगी पडते. शनिवार आणि रविवार या दोन दिवशी मी पुस्तकं वाचतो.

























































