
फ्रान्सचा स्टार फुटबॉलपटू किलियन एम्बापे पॅरिस सेंट जर्मेन (पीएसजी) हा फ्रेंच क्लब सोडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण स्पॅनिश क्लब रियल माद्रिदने किलियन एम्बापेसाठी पीएसजीला 1400 कोटी रुपयांची ऑफर दिली आहे. नुकताच अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लियोनेल मेस्सीने पीएसजी क्लबमध्ये प्रवेश केला आहे. नेमार आणि किलियन एम्बापे याआधीच पीएसजीमधून खेळत आहेत. लियोनेल मेस्सीच्या येण्याने पीएसजीचा संघ रथी-महारथी खेळाडूंनी सजलेला सर्वांत तगडय़ा संघांपैकी एक बनला होता.
एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार रियल माद्रिदने किलियन एम्बापेला संघात घेण्यासाठी पीएसजीला 1710 दशलक्ष पौंड म्हणजेच जवळपास 1395 कोटी रुपयांची ऑफर दिली आहे. किलियन एम्बापेचा पीएसजीसोबतचा करार या वर्षी संपुष्टात येत आहे. तसेच किलियन एम्बापेलाही रियल माद्रिदमध्ये सामील व्हायचे आहे. रियल माद्रिदने दिलेली ऑफर कमी असल्याचे पीएसजीचे म्हणणे आहे. त्यामुळे आणखी मोठी ऑफर मिळते का, याची वाट पीएसजी पाहत आहे.





























































