
शिंक येणे ही आपल्या शरीराची एक प्रतिक्षिप्त क्रिया आहे. नाकात जंतूंचा किंवा अशा एखाद्या घटकाचा प्रवेश झाला, जो नुकसानकारकर असेल तर आपल्याला शिंक येते. सर्वसाधारणतः सर्दी-पडसे या आजाराची पहिली ओळख देखील शिंक असते. शिंक आल्याने आपल्या नाकातील नकोशी केमिकल्स, कवकांचे कण, धूळ आणि विषाणू बाहेर फेकले जातात. पण, तुम्ही कधी निरीक्षण केलं आहे का, की आपल्याला झोपेत शिंक येत नाही.
या प्रश्नावर तज्ज्ञ सांगतात की, जेव्हा आपण झोपेत असतो, तेव्हा आपल्याला शिंक येत नाही. याच्या मागचं मुख्य कारण आहे तो म्हणजे आपला मेंदू. मेंदू आपल्या शरीराला नियंत्रित करत असतो. त्यामुळे शरीराची जागृत किंवा निद्रीत अवस्था असेल तर त्या काळात शरीराच्या कोणत्या क्रिया सुरू ठेवायच्या आणि कोणत्या बंद करायच्या हे निर्णय मेंदू घेतो. त्यानुसार, जेव्हा आपलं शरीर झोपलेलं असतं, तेव्हा मेंदू प्रतिक्षिप्त क्रिया बंद करतो. उदा. शिंक येणे किंवा खोकला येणे. आपल्याला झोपेत खोकल्याची उबळ आली किंवा शिंक आली तर आपण जागे होतो आणि खोकू किंवा शिंकू लागतो. पण, एकाच वेळी झोप आणि प्रतिक्षिप्त क्रिया होऊ शकत नाही.
अर्थात हे तुमच्या झोपेवरही अवलंबून असतं. झोपेचे दोन ठळक भाग असतात. एक नॉन रॅपिड आय मूव्हमेंट (एनआरईएम) आणि रॅपिड आय मूव्हमेंट (आरईएम). निद्रावस्था सुरू झाल्यावर सुरुवातीला आपण एनआरईएम अवस्थेत असतो. म्हणजे आपली झोप सावध असते. या अवस्थेच्याही तीन पातळ्या असतात. त्यातील तिसऱ्या पातळीवर आल्यानंतर आपण गाढ झोपतो. अशा अवस्थेत शिंक येणं कठीण असतं कारण त्यावेळी आपला मेंदू शिंक येऊ शकणाऱ्या हवेतील विषाणू किंवा धुलिकण, पराग कण यांच्याकडे आकर्षित होत नाही.
जर आपण आरईएम या निद्रावस्थेत असू तर आपल्याला स्वप्न पडतात. त्यावेळी आपल्या शरीराच्या अवस्थेला मोटर एटोनिया असं म्हटलं जातं. ही अवस्था शरीराला हालचाल करू देत नाही. आपल्या स्वप्नात काय होत आहे, हे जाणून घेण्यासाठी आपण आपल्या नकळत शरीराची हालचाल करू शकतो. पण, तीच क्रिया रोखण्याचा प्रयत्न मेंदू करतो. त्याचा परिणाम शिंकेवर होतो. कारण, शिंकण्याची कृती करण्यासाठी आपल्याला काही पेशींच्या नियंत्रित हालचालीची गरज असते. पण, मोटर एटोनिया स्थितीत असल्यामुळे आपल्या पेशी काम करू शकत नाहीत. त्यामुळेच झोपेत असताना आपल्याला शिंक येत नाही.
























































