बंडखोरांविरुद्ध तीव्र पडसाद; जनता रस्त्यावर उतरली; पुण्यात तानाजी सावंत यांचे कार्यालय फोडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनेविरोधात बंड करून एकनाथ शिंदे यांच्या गटात गेलेले बंडखोर आमदार तानाजी सावंत यांचे पुण्यातील कार्यालय संतप्त शिवसैनिकांनी फोडले. कार्यालयाच्या काचेकर ‘गद्दार सावंत’ असे लिहून आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या, तर सदाशिव पेठ येथे एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्यातर्फे उभारण्यात आलेल्या वैद्यकीय मदत कक्षाच्या बोर्डाला काळे फासण्यात आले.

शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केल्याने शिवसैनिक संतप्त झाले आहेत. शिवसैनिकांनी आज आमदार तानाजी सावंत यांच्या धनकवडी परिसरातील सावंत प्लाझा येथील भैरवनाथ शुगर कारखान्याच्या कार्यालयाकर धडक दिली. शिवसेनेशी गद्दारी करणाऱयांना असेच उत्तर मिळणार, असे म्हणत शिकसैनिकांनी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. कार्यालयातील टेबल, खुर्च्या, काचांची तावदाने फोडून टाकली. माजी नगरसेवक विशाल धनावडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

मराठवाडय़ात शिवसैनिकांचा संतापाचा ज्वालामुखी फुटला

शिवसेनेशी दगलबाजी करणाऱया बंडखोर आमदारांच्या विरोधात मराठवाडय़ातील शिवसैनिकांच्या संतापाचा ज्वालामुखी फुटला. परभणीत शिवसैनिकांनी बंडखोरांचे म्होरके एकनाथ शिंदे व गुलाबराव पाटील यांच्या प्रतिमेची गाढवावरून धिंड काढली. धाराशिव येथे आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड करत त्यांच्या पोस्टरला काळे फासण्यात आले. नांदेडात आमदार बालाजी कल्याणकर यांची शिवसैनिकांनी प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली तर बीड येथे शिवसैनिकांनी मुंडण करून बंडखोरीचा निषेध केला.

धाराशिव येथे पोलीस लाईनसमोरील रस्त्यावर आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांचे संपर्क कार्यालय आहे. सकाळी 11.30 वाजता संतप्त शिवसैनिकांनी या कार्यालयावर हल्लाबोल केला. कार्यालयावर असलेल्या फलकाची तोडफोड करण्यात आली, काळे फासण्यात आले. कार्यालयाच्या शटरवर शिवसैनिकांनी गद्दार, खेकडा असे लिहिले. परंडा येथे मध्यवर्ती चौकात आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या पुतळय़ाला जोडे मारण्यात आले. भूम येथेही शिवसैनिकांनी आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या प्रतीकात्मक पुतळय़ाची अंत्ययात्रा काढून जोडे मारले. नांदेड उत्तर मतदारसंघाचे बंडखोर आमदार बालाजी कल्याणकर यांची शिवसैनिकांनी प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली. आमदार कल्याणकर यांच्या निवासस्थानासमोर शिवसैनिकांनी तुफान घोषणाबाजी केली.

परभणी येथे संतप्त शिवसैनिकांनी बंडखोरांचे नेतृत्व करणारे एकनाथ शिंदे व गुलाबराव पाटील यांच्या प्रतिमांची गाढवावरून धिंड काढली. यावेळी शिवसैनिकांनी ‘गद्दारांचे करायचे काय, खाली मुंडके वर पाय’, ‘शिवसेनेशी जो नडला, शिवसैनिकांनी तो गाडला’, ‘शिवसेनेशी गद्दारी करणाऱयांचा निषेध असो’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. गद्दारांचे पुतळे जाळून शिवसैनिकांनी आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली. बीड येथे 42 शिवसैनिकांनी मुंडण करून बंडखोर आमदारांचा निषेध केला.

शंभूराज देसाईंच्या साताऱयातील घरासमोर निदर्शने

बंडखोरांना जाऊन मिळालेल्या गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या सातारा येथील घरासमोर आज संतप्त शिवसैनिकांनी धडक देऊन जोरदार निदर्शने केली. देसाई यांच्या कृतीचा धिक्कार करत ‘गद्दारांना माफी नाही’ असे शिवसैनिकांनी यावेळी सुनावले.

शिवसेनेने मानसन्मान, मंत्रीपद देऊनही देसाई यांनी पाठीत खंजीर खुपसल्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी आज दुपारी तीनच्या सुमारास पोवई नाक्यापासून देसाई यांच्या घराच्या दिशेने कूच केले. ‘आवाज कुणाचा… शिवसेनेचा’, ‘शिवसेना झिंदाबाद’, ‘गद्दारांना माफी नाही’ अशा गगनभेदी घोषणा देत शिवसैनिकांनी पोवई नाक्याचा परिसर दणाणून सोडला. देसाई यांच्या घरासमोर त्यांनी निदर्शने केली.

उल्हासनगरात श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयावर हल्ला

पालघर, बोईसरमध्ये शिंदेंच्या फोटोला काळे फासले. उल्हासनगरात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या संपर्क कार्यालयाची शिवसैनिकांनी तोडफोड केली. नवी मुंबईत एकनाथ शिंदे यांचे फोटो हटवून कचऱयाच्या डब्यात फेकले.