मुंबईत एक हजार मेगावॅट वीज आणण्याचा मार्ग मोकळा, दोन वर्षांत काम पूर्ण

300

मुंबईत एक हजार मेगावॅट अतिरिक्त वीज आणण्याचा मार्ग पाच वर्षांनंतर मोकळा झाला आहे. खारघरपासून विक्रोळीपर्यंत 400 आणि 220 किलोवॅटची (केव्ही) समांतर उच्चदाब वीज वाहिनी टाकण्याबरोबरच अत्याधुनिक वीज उपकेंद्र (रिसिव्हिंग स्टेशन) उभारण्याचे निर्देश वीज आयोगाने 2015 मध्ये दिले होते. त्यानुसार हे काम करण्याबाबतचे टेंडर अदानी ट्रन्समिशन लिमिटेडला दिले आहे. पुढील दोन वर्षांत हे काम पूर्ण केले जाणार आहे.

सध्या मुंबापुरीची विजेची कमाल मागणी साडेतीन हजार मेगावॅट एवढी आहे. तर मुंबईत सुमारे 3600 मेगावॅट एवढी वीज उपलब्ध होत आहे. त्यामध्ये टाटा पॉवरच्या ट्रॉम्बे आणि खोपोली येथील वीज केंद्रातून सुमारे 1600 मेगावॅट, अदानीच्या डहाणू वीज केंद्रातून 500 मेगावॅट तर महापारेषणच्या वीज वाहिन्यांच्या माध्यमातून 1500 मेगावॅट वीज आणली जाते. त्यामुळे सध्या विजेची मागणी आणि पुरवठ्याचा मेळ बसत असला तरी भविष्यात वाढणारी विजेची मागणी विचारात घेऊन राज्यातून वाढीव एक हजार मेगावॅट वीज आणण्यासाठी खारघर ते विक्रोळीदरम्यान पारेषण वाहिनी उभारणे आणि 400 केव्हीचे सबस्टेशन उभारण्याचे काम टाटा पॉवरला दिले होते, मात्र त्यांनी सदर काम न केल्याने वीज आयोगाच्या निर्देशानुसार महापारेषणने नुकतेच टेंडर मागवले होते. त्यानुसार हे काम अदानी कंपनीला मिळाले आहे. त्यामुळे सदर काम पुढील दोन वर्षांत पूर्ण करणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

35 वर्षे संचलन, देखभाल करणार

खारघर-विक्रोळीदरम्यान स्वखर्चाने वीज वाहिनी टाकणे, सबस्टेशन उभारणे, त्याचे संचलन करणे आणि देखभाल-दुरुस्तीचे काम पुढील 35 वर्षांपर्यंत अदानी ट्रन्समिशनला करावे लागणार आहे. त्याबदल्यात संबंधित कंपनीला वीज वहनाच्या (व्हीलिंग चार्जेस) माध्यमातून महसूल मिळणार आहे. दरम्यान, मुंबईत प्रथमच 400 केव्हीचे रिसिव्हिंग स्टेशन होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या