
देशाच्या डळमळीत झालेल्या अर्थव्यवस्थेत वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) वसुलीच्या डोसमुळे तरतरी येण्याची आशा आहे. कोरोनाचा आव्हानात्मक काळ असतानाही डिसेंबरमध्ये जीएसटीची रेकॉर्डब्रेक वसुली झाली. या एका महिन्यात जीएसटीच्या माध्यमातून तब्बल 1 लाख 15 हजार कोटींहून अधिक उत्पन्नाची देशाच्या तिजोरीत भर पडली आहे.
देशात जीएसटीची अंमलबजावणी झाल्यापासून पहिल्यांदाच एका महिन्यात 1 लाख 15 हजार 174 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. कोरोनाच्या लॉकडाऊननंतर अर्थव्यवस्था हळूहळू रुळावर येत आहे. महामारीच्या बिकट परिस्थितीतही जीएसटीची सलग तिसऱया महिन्यात 1 लाख कोटींहून अधिक वसुली झाली आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, डिसेंबरच्या एकूण जीएसटी महसूलामध्ये पेंद्रीय जीएसटीचे योगदान 21,365 कोटी, तर राज्यांचा जीएसटी 27,804 कोटी रुपये जमा झाला आहे. तसेच एकीपृत जीएसटी 57,426 कोटी रुपये आणि उपकर 8,579 कोटी रुपये असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. यापूर्वी एप्रिल 2019 मध्ये 1 लाख 13 हजार 866 कोटी रुपयांच्या जीएसटी वसुलीचा विक्रम नोंद झाला होता.
डिसेंबर 2019 च्या तुलनेत डिसेंबर 2020 मध्ये जीएसटीच्या माध्यमातून 12 टक्के अधिक उत्पन्न प्राप्त झाले. तसेच वस्तूंच्या आयातीतून 27 टक्के अधिक, तर देशांतर्गत व्यवहारातून 8 टक्के अधिक उत्पन्नाची भर पडली. मंदीच्या चक्रव्यूहात अडकलेल्या अर्थव्यवस्थेसाठी हा मोठा आधार मानला जात आहे.
आर्थिक वर्ष 2020-21 मधील जीएसटी वसुलीचा आलेख
(उत्पन्न कोटी रुपयांमध्ये)
एप्रिल 32,172
मे 62,151
जून 90,917
जुलै 87,422
ऑगस्ट 86,449
सप्टेंबर 95,480
ऑक्टोबर 1,05,155
नोव्हेंबर 1,04,963

























































