नगर जिल्ह्यात कांदा पिकाची लागवड विक्रमाकडे, 1 लाख 42 हजार हेक्टरवर लागवड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कधी शेतकऱ्यांच्या, तर कधी ग्राहकांच्या डोळ्यांत पाणी आणणाऱ्या कांदा पिकाला यंदा शेतकऱ्यांनी पहिली पसंती दिल्याचे दिसत आहे. आतापर्यंतचा एक लाख 10 हजारांची लागवडीचा टप्पा यंदा मोडीत काढत शेतकऱ्यांनी चालू हंगामात एक लाख 42 हजार हेक्टरवर कांदा पिकाची लागवड केली आहे. येत्या आठ दिवसांत कांदालागवडीचे क्षेत्र हे दीड लाखाच्या पुढे जाण्याची शक्यता कृषी विभागाकडून व्यक्त होत आहे.

सततचा पाऊस, खराब हवामान असतानादेखील शेतकरी मोठी जोखीम घेऊन कांदापिकाची लागवड करताना दिसत आहेत. यंदा परतीचा पाऊस लांबल्याने ज्वारी पिकाच्या पेरणीची अडचण झाली. जवळपास ज्वारी पिकाचे क्षेत्र अन्य पिकांकडे वळले. याचसोबत यंदा आश्चर्यकारक म्हणजे, हरभऱयाची पेरणीदेखील 50 टक्क्यांनी घटली आहे. या दोन्ही पिकांऐवजी शेतकऱयांनी कांदा पिकाला पसंती दिल्याचे कांदा पिकाच्या लागवडीच्या आकडेवारीवरून दिसत आहे.

राहाता बाजार समितीत कांदा तीन हजारांवर

राहाता बाजार समितीत सोमवारी कांद्याच्या 9355 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्तीत जास्त 3000 भाव मिळाला, तर सोयाबीनला जास्तीत जास्त 6320 रुपये इतका भाव मिळाला. उन्हाळी कांदा नंबर 1ला 2600 ते 3000 रुपये असा भाव मिळाला. नंबर 2ला 1650 ते 2550 रुपये भाव मिळाला. नंबर 3ला 600 ते 1600 भाव मिळाला. गोल्टी कांद्याला 1800 ते 2000 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला 100 ते 600 रुपये भाव मिळाला.

10 हजार मोजूनही लागवडीला मजूर मिळेनात

दुसरीकडे कांदा पिकाला चांगला भाव मिळत असल्याने एकरी लागवडीसाठी हजारो रुपयांचा खर्च सोसून शेतकरी कांदा लागवड करीत आहेत. जिह्यात कांदा लागवडीसाठी असणारा एकरी सात ते आठ हजारांचा भाव आता 10 हजारांपर्यंत वधारला आहे. एवढी रक्कम मोजूनदेखील शेतकऱयांना कांदा लागवड करणाऱया अनुभवी महिलांच्या टोळ्या मिळत नसल्याचे चित्र आहे. तरीही जिह्यात दरआठवडय़ाला कांदालागवडीचे क्षेत्र वाढताना दिसत आहे.

धुक्याने कांदा उत्पादक धास्तावले

धुक्यामुळे भाजीपाल्यावर कीड-रोगांचा प्रादुर्भाव, तसेच लागवड केलेल्या कांद्याचे नुकसान होण्याच्या भीतीने शेतकरी धास्तावले आहेत. मागील 15 दिवसांत अनेक भागांत अवकाळी पाऊस झाला. त्यानंतर आठ दिवसांपूर्वी दाट धुके पडले होते. बहुतांश तालुक्यांत धुके होते. यामुळे वांगी, फ्लॉवर, कोबी, गवार, भेंडी, मेथी, पालक, टोमॅटो, वाटाणा यांसह अन्य पालेभाज्या व भाजीपाल्यावर कीड-रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे.