नगरविकास खात्याचा हजारो तरुणांच्या पोटावर पाय,मुंबई पालिकेतील भरती रखडली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

भरती परीक्षा उत्तीर्ण झालो. आता महानगरपालिकेत नोकरी मिळणारच, अशी स्वप्ने पाहणाऱया हजारो मराठी तरूणांच्या पदरी राज्य सरकारमुळे निराशाच पडणार की काय अशी अवस्था आहे. पालिकेच्या मलनिःसारण, जलअभियंता, आरोग्य विभाग तसेच रुग्णालयांमधील १३८८ रिक्त पदांसाठी गेल्या फेब्रुवारीत घेण्यात आलेल्या भरती परीक्षेत एक लाखांवर उमेदवार उत्तीर्ण झाले. मात्र यापूर्वीच्या भरतीतील उमेदवारांना आधी संधी द्या अशा भाजपा आमदाराच्या मागणीनंतर सरकारच्या नगरविकास खात्याने फेब्रुवारीतील भरती थांबवली आहे.

महापालिकेने ‘ड’ वर्गातील रिक्त पदांच्या भरतीसाठी १५ ते २५ फेबुवारीदरम्यान दहा दिवस राज्यभरातील विविध जिह्यांत तीन सत्रांमध्ये परीक्षा घेण्यात आली होती. त्या परीक्षेसाठी २ लाख ४० हजार ४९५ उमेदवार बसले होते. त्यातील १,०६,१९३ उमेदवारांना ५० व त्यापेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. ९१ ते १०० गुण मिळालेल्या उमेदवारांची संख्या ३४ असून ८१ ते ९० गुण मिळालेले उमेदवार १५३२ इतके आहेत. या ऑनलाइन परीक्षेचा निकाल लागल्यानंतर आता भरतीसाठी निवड करण्यात येण्याच्या प्रतीक्षेत असतानाच नगरविकास विभागाने ही भरती प्रक्रिया थांबवून पालिकेकडे अहवाल मागविला आहे.

२००९ सालच्या प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना पहिल्यांदा संधी द्यावी आणि फेब्रुवारीची भरती प्रक्रिया रद्द करावी अशी मागणी भाजप आमदार भाई गिरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. १४ मार्च रोजी विधान परिषदेत माहितीच्या मुद्याद्वारे भरतीवर आक्षेप घेतला गेल्याने सभापतींनी सरकारला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याचे त्यात म्हटले आहे.

विधानपरिषद सभापतींच्या निर्देशानुसार महापालिकेने अहवाल सादर केला असून भरती करणे आवश्यक असल्याचे अहवालात म्हटले आहे. सदर भरती प्रक्रियेची पुढील कार्यवाही सुरू करण्याची परवानगी महापालिकेने नगरविकास विभागाकडे मागितली आहे, मात्र याबाबत नगरविकास विभागाने अद्याप प्रतिसाद दिलेला नाही.

२००९ नंतर आता २०१८ चीही भरती रखडली

२००९ साली चतुर्थ श्रेणी कर्मचाऱयांच्या झालेल्या भरतीत १८ हजार ९९६ उमेदवारांपैकी ५१८६ उमेदवारांना १०० पैकी १०० गुण मिळाले होते, मात्र ही भरती ३९१६ पदांसाठी असल्याने उर्वरित उमेदवारांना १०० पैकी १०० गुण मिळूनही सामावून घेता आले नाही. यामुळे अन्य विद्यार्थी उच्च न्यायालयात गेल्याने ही भरती प्रक्रिया रखडली होती.

उमेदवारांची मंत्रालयावर धडक, आंदोलनाचा इशारा

भरती थांबवली गेल्याचे समजताच या भरतीमधील उमेदवारांनी आज मंत्रालयावर धडक दिली. नगरविकास विभागाकडे त्यांनी दाद मागितली आहे. हा आमच्यावर अन्याय असून भरतीची अंतिम यादी न लावल्यास आम्ही आंदोलन करू, असा इशारा या उमेदवारांचे प्रतिनिधी प्रशांत राशिनकर यांनी दिला.