
सामना प्रतिनिधी । मुंबई
पश्चिम रेल्वेसाठी मुंबईत दाखल झालेल्या ‘भेल’ कंपनीच्या दुसर्या वातानुकूलित लोकलमध्येही पहिल्या वातानुकूलित लोकलप्रमाणेच तांत्रिक त्रुटी आढळल्याने पश्चिम रेल्वेने तिसरी वातानुकूलित लोकल लागलीच पाठवू नका, अशी विनंती रेल्वे बोर्डाला केली आहे.
उपनगरीय मार्गावर देशातील पहिली वातानुकूलित लोकल 2015 साली मुंबईत आली, मात्र तिची उंची आणि इतर तांत्रिक बाबींची पूर्तता करता करता तिला धावण्यास डिसेंबर 2017 साल उजाडले. सध्या या पहिल्या वातानुकूलित लोकलच्या पश्चिम रेल्वेवर विरार ते चर्चगेटदरम्यान दिवसभरात 12 फेर्या होत आहेत. ‘भेल’ कंपनीनेच तयार केलेल्या दुसर्या वातानुकूलित लोकलला मुंबईत चाचणीसाठी मे महिन्यात पाठवून देण्यात आले आहे. त्या लोकलच्या मध्य आणि पश्चिम रेल्वे चाचण्या होऊन ही लोकलदेखील पश्चिम रेल्वेला मिळणार आहे. मात्र या लोकलमध्येही पहिल्या एसी लोकलप्रमाणेच तांत्रिक दोष आढळले असून त्याची पूर्तता करतानाच तंत्रज्ञांची कसोटी लागली आहे. त्यातच आता चेन्नईची आयसीएफ कोच फॅक्टरी तिसरी एसी लोकल मुंबईत पाठविण्याच्या बेतात आहे. एसी लोकलच्या दरवाजाचा स्वयंचलित बंद होण्याच्या यंत्रणेत काही उणिवा आहेत. यासंदर्भातील सॉफ्टवेअर योग्य प्रकारे काम करीत नसल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टिममध्येही काही उणिवा आहेत.
‘आयसीएफ तिसरी एसी लोकल पाठविण्याच्या बेतात आहे, परंतु दुसर्या एसी लोकलच्या चाचण्या अद्यापही सुरू असून तिच्यात पहिल्या एसी लोकलप्रमाणेच काही तांत्रिक दोष आहेत. त्यामुळे आम्ही तिसरी लोकल इतक्यात पाठवू नका, असे रेल्वे बोर्डाला कळविले असल्याचे पश्चिम रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.
‘भेल’च्या कामगिरीविषयी नाराजी
एमयूटीपी-3 प्रकल्पांतर्गत मुंबईला 47 एसी लोकल मिळणार आहेत. आयसीएफने त्यासाठी टेंडर मागविताना किमान दहा एसी लोकल तयार करण्याचा पूर्वानुभव असण्याची अट घातली होती. ‘भेल’ कंपनीला टेंडरमधून हटविण्यासाठी ही अट घातल्याचा आरोप झाला होता. आयसीएफ स्वतः ‘भेल’च्या एसी लोकलच्या परफॉर्मन्सवर नाराज असल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर ‘भेल’ कंपनीने पीएमओ कार्यालयातून ही जाचक अट टेंडरमधून काढून टाकण्यासाठी प्रयत्न केले होते.
कडेकडेनं चला… माय लेफ्ट इज माय राइट
प्रवाशांच्या गर्दीला शिस्त लावण्यासाठी मध्य रेल्वेच्या आरपीएफतर्फे ‘माय लेफ्ट इज माय राइट’ ही अभिनव जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. रेल्वे स्थानक, पादचारी पुलांवर प्रवाशांनी आपल्या लेफ्ट (डाव्या) बाजूने चालावे आणि स्वतःसह इतर प्रवाशांचा प्रवास सुरक्षित करावा असे मार्गदर्शन आरपीएफचे जवान हातात मेगाफोन घेऊन करताना दिसत आहेत. 24 जुलैपासून ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. साधारणपणे एका महिना ही जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. प्रवाशांना डाव्या बाजूने चालण्याची शिस्त लागावी यासाठी प्रवासी संघटना, शालेय विद्यार्थी, स्थानिक मंडळे आणि सामाजिक संघटनांची मदत घेतली जाणार आहे. तसेच आरपीएफच्या 182 या हेल्पलाइनचा प्रवाशांनी जास्तीत जास्त वापर करावा यासाठी देखील प्रयत्न केले जाणार आहेत.
























































