
भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही. लुटारूंची टोळी वावरतेय. महापालिका भ्रष्टाचाराने पोखरल्यात असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील सत्ताधारी भाजपवरच थेट हल्ला केला. या हल्ल्याने घायाळ झालेल्या भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ‘खुद के गिरेबान में झाक कर देखिए… आम्ही बोललो तर तुमची अडचण होईल,’ असा थेट इशारा अजितदादांना दिला. अजितदादांना सोबत घेतल्याचा पश्चात्ताप होतोय, असेही ते म्हणाले.
अजित पवारांनी सर्वप्रथम स्वतःच्या पक्षाकडे पाहिले पाहिजे. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाविषयी बोलत आहेत हे त्यांनी लक्षात ठेवावे. प्रत्यक्षात आरोप-प्रत्यारोप कसे करावेत हे त्यांनी ठरवले पाहिजे. आम्ही कधी आरोप करायला गेलो तर त्यांना फार अडचणी निर्माण होतील. त्याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे, असा इशाराही रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिला.
अजित पवारांना राजकारणाचा दीर्घ अनुभव असल्याने त्यांनी केवळ आरोप न करता संबंधित यंत्रणांकडे रीतसर तक्रार करावी. पुण्याची निवडणूक ही पुणेकरांच्या नागरी समस्या सोडवण्याच्या मुद्दय़ावर होत आहे. पुणेकरांना चांगल्या सुविधा कोण देऊ शकते यावर ही निवडणूक होत आहे. त्यांना या सुविधा भाजपच देऊ शकते, असे चव्हाण म्हणाले.
अजित पवार हे भाजपसोबत कशा पद्धतीने जोडले गेले, हे सर्वांना माहिती आहे. त्यांना सोबत घेण्याबाबत पुणे, पिंपरी-चिंचवडमधील पक्षाचे पदाधिकारी मला थोडा विचार करा म्हणून सांगत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही मी नेहमी खासगीत सांगायचो की थोडा विचार करावा, पण आता पवार यांना सोबत घेत असल्याचा पश्चाताप होत असल्याचे चव्हाण म्हणाले.
70 हजार कोटींच्या आरोपावर बोलणे टाळले
‘तुम्ही ज्यांच्यावर 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले आहेत, त्यांच्याबरोबरच तुम्ही आज सत्तेत आहात,’ असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, चव्हाण यांनी ‘मी तुम्हाला काल अजित पवार यांनी केलेल्या आरोपांवर जे उत्तर द्यायला हवे होते ते दिले आहे,’ असे सांगून पत्रकारांच्या प्रश्नावर बोलणे टाळले. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आमच्याकडेच हे लक्षात ठेवा – चंद्रकांत पाटील
आम्हाला दमात आणि हलक्यात घेऊन नका. मुख्यमंत्री आणि गृहमंत्रीही आमच्याकडेच आहेत हे लक्षात ठेवा, असा दम भाजप नेते, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सांगली येथे दिला. नगरपरिषदेच्या निवडणुकीत त्यांनी म्हटले होते की, तिजोरीची चावी त्यांच्याकडे आहे. त्यावर मी भोरमधील सभेत म्हटले की, तिजोरीची चावी तुमच्याकडे असेल पण तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे. मी आता त्यांना म्हणेल मुख्यमंत्री आमच्याकडे आहेत आणि गृहमंत्रीपण आमच्याकडेच आहेत. त्यामुळे दमात आणि हलक्यात घेऊ नका, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.






























































