डॉ. शेळकेंविरोधातील गुन्ह्यासह 24 आर्थिक प्रकरणांचा तपास पूर्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डॉ. नीलेश शेळकेविरोधात शहर सहकारी बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्यासह अन्य 23 आर्थिक गुन्ह्यांचा तपास पोलिसांनी पूर्ण केला असून, या प्रकरणांची दोषारोपपत्रे न्यायालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यातील डॉ. शेळकेविरोधातील गुन्ह्याचे दोषारोपपत्र दाखल केले असल्याचे उपअधीक्षक सोनवणे यांनी सांगितले.

नगर शहर सहकारी बँकेच्या बोगस कर्जप्रकरणी डॉ. नीलेश विश्वास शेळकेविरोधात तीन गुन्हे दाखल असून, त्यांचा तपास पूर्ण झाल्याने  दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. हॉस्पिटलमधील मशिनरी खरेदीसाठी नगर शहर बँकेने 17 कोटी 25 लाख रुपयांचे बोगस कर्जवाटप केल्याने डॉ. शेळके व संचालक मंडळासह 25 जणांविरुद्ध फसवणुकीचे तीन गुन्हे कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल आहेत.  याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासी अधिकारी पोलीस उपअधीक्षक प्रांजल सोनवणे यांनी केला आहे.

रेखा जरे हत्याकांडातील आरोपी बाळ बोठे याला शोधण्यासाठी पुणे येथे गेलेल्या पोलीस पथकाच्या हाती डॉ. शेळके लागला होता. बोठेला फरार होण्यात मदत केल्याच्या प्रकरणात त्याची पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्याला शहर सहकारी बँक फसवणूक प्रकरणात अटक करण्यात आली होती. फसवणुकीचे तीन गुन्हे दाखल असल्याने शेळके याला तीनही गुन्ह्यात वर्ग करण्यात आले होते.