
महाराष्ट्रात महाविकास आघाडीला बदनाम करण्याचे केंद्र सरकार व परमबीर सिंह यांचे ‘डील’ झाले आहे. त्यातूनच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खोटे आरोप लावण्यात आले. आता केंद्रीय यंत्रणा परमबीर सिंह यांना वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे. पण एक दिवस एनआयएला खरे काय आहे हे सांगावे लागेल. सत्य जास्त दिवस लपून राहणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी आज दिला.
या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने चांदिवाल आयोग नेमला असून या आयोगासमोर सचिन वाझे याने अनिल देशमुख यांना पैसे दिले नाही असा जवाब नोंदवला असल्याचे समोर येत आहे याकडे नवाब मलिक यांनी लक्ष वेधले.
परमबीर सिंह यांच्या घरात शर्मा आणि वाझे यांची बैठक का झाली? त्यांचे नाव घेतले जाते? ड्रायव्हरचा जवाब सांगितला जातो, इनोव्हा गाडीची चर्चा होते, मात्र परमबीर सिंहांच्या नावाची चर्चा होत नाही. ‘एनआयए’ केंद्र सरकारच्या दबावाखाली परमबीर सिंह यांना वाचवत आहे हे सत्य आहे, असे नवाब मलिक म्हणाले.
तो मास्टरमाइंड कोण?
अँटिलियाच्या बाहेर सापडलेल्या जिलेटिनच्या कांडय़ांप्रकरणी ‘एनआयए’ने परमबीर सिंह यांचा जवाब नोंदविल्यानंतर ते फरार झाले, मात्र ‘एनआयए’ने चार्जशीटमध्ये जो मास्टरमाइंड आहे तो कोण आहे हे सांगितले पाहिजे, ‘एनआयए’ने अद्याप त्यावर चार्जशीट का दाखल केली नाही? असा सवाल त्यांनी केला.




























































