
सामना प्रतिनिधी । कल्याण
नैसर्गिक संकट असो की मानवनिर्मित…आणीबाणीच्या प्रसंगी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून कल्याण-डोंबिवलीकर एकत्र होतात याची प्रचीती आज पुन्हा एकदा आली. चांदवडनजीक भीषण अपघातात १० ठार आणि १४ गंभीर जखमी झालेल्या सफाई कामगारांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी कल्याण- डोंबिवली पालिकेचे सर्व नगरसेवक आणि कर्मचारी खंबीरपणे उभे राहिले आहेत. शिवसेनेने अपघातग्रस्त २४ कुटुंबांसाठी कल्याण- डोंबिवलीकरांनी पुढे येण्याचे आवाहन केले होते. या हाकेला प्रतिसाद म्हणून पालिकेचे नगरसेवक आणि कर्मचारी धावले आहेत.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका सेवेतील आजी माजी २५ सफाई कामगार ४ जून रोजी कुटुंबांसमवेत खासगी मिनी बसने श्रीक्षेत्र उज्जैन येथे देवदर्शनाला गेले होते. देवदर्शन करून गुरुवारी परतत असताना चांदवडजकळ मिनी बस आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात १० जण जागीच ठार झाले तर १४ जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताने या कसाहतीत दु:खाचा डोंगर कोसळला. या सर्वांची कुटुंबे उघडय़ाकर आली. सर्वांनी यांच्याप्रती सहवेदना व्यक्त केल्या.
सामाजिक बांधिलकीपोटीच…
या कुटुंबांना आर्थिक हातभार देणे मोठे आव्हान होते. सामाजिक बांधिलकी म्हणून महापौर विनिता राणे, शिवसेनेचे दिंडोरी लोकसभा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, महानगरप्रमुख विजय साळवी, शहरप्रमुख विश्वनाथ भोईर, माजी महापौर राजेंद्र देवळेकर, माजी परिवहन सभापती रवी वपोते, सभागृह नेता राजेश मोरे, गटनेता रमेश जाधव, नगरसेवक दीपेश म्हात्रे, प्रकाश पेणकर, विश्वनाथ राणे, सचिन बासरे, दीपक सोनाळकर, रकी पाटील, शरद पाटील आदींनी अपघातग्रस्त २४ कुटुंबांसाठी कल्याण-डोंबिवलीकरांनी पुढे येण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून उपमहापौर प्रतीक्षा भोईर, विरोधी पक्षनेता मंदार हळबे यांच्यासह सर्व गटनेते आणि नगरसेवकांनी एक महिन्याचे मानधन देण्याची तयारी दर्शवली. आयुक्त गोविंद बोडके यांनीही अधिकारी, कर्मचारी एक दिवसाचे वेतन देतील असे जाहीर केले.



























































