
सामना प्रतिनिधी । संभाजीनगर
शहरात निर्माण झालेली कचराकोंडी कधी फुटणार? या कोंडीतून तातडीने मार्ग काढा आणि शहर कचरामुक्त करा, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी पत्रकारांना सांगितले.
शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे, पालकमंत्री डॉ. दीपक सावंत, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, महापौर नंदकुमार घोडेले, स्थायी समितीचे सभापती राजू वैद्य व सभागृह नेता विकास जैन यांनी बुधवारी मुंबईत मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगर शहरातील विकासकामांचा आढावा घेतला. शहरातील कचऱ्याचा प्रश्न कधी सुटणार, अशी विचारणा पक्षप्रमुखांनी केली. त्यावर कचऱ्याच्या प्रश्नावर मनपाने आतापर्यंत केलेल्या कामाची माहिती त्यांना देण्यात आल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले. कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या मशीनच्या निविदा अंतिम टप्प्यात आहेत, अशी माहितीही त्यांना देण्यात आली. त्यावर लवकरात लवकर कचराकोंडी फोडा आणि शहर कचरामुक्त करा, असे आदेश पक्षप्रमुखांनी दिल्याचे महापौरांनी सांगितले. यावेळी स्मार्ट सिटी, समांतर, भूमिगत गटार व रस्ते कामांवरही चर्चा झाल्याचे ते म्हणाले.
विमान उशिरा असल्याने नागपूरला जाता आले नाही
नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कचरा प्रश्नावर बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला आम्ही मुंबईहून विमानाने जाणार होतो. परंतु पावसामुळे विमान उशिरा निघणार असल्याने बैठकीला पोहोचता आले नाही असे महापौर नंदकुमार घोडेले म्हणाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनीही कचरा प्रश्न लवकर सुटावा अशीच भावना व्यक्त केली आहे असे महापौर म्हणाले.
शहरातील ८० टक्के कचरा उचलला
शहरातील रस्त्यावर साचलेले कचऱ्याचे ढीग हटविण्याचे काम दोन दिवसात करण्यात आले असून सुमारे एक हजार टन कचरा उचलण्यात आला आहे. आता केवळ ३०० टन कचरा शिल्लक असून तोही उचलण्यात येणार आहे. महिनाभरात कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावला जाईल अशी ग्वाही यावेळी महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली. शहर कचरामुक्त करण्यासाठी शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
समांतर प्रश्नी २४ रोजीच्या सभेत निर्णय घेणार
समांतर पाणी पुरवठा योजनेचे पुनरूज्जीवन करण्यासाठी २४ जुलै रोजी सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत सर्व नगरसेवकांना विश्वासात घेवून निर्णय घेतला जाईल. या निर्णयाची माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देण्यात येणार असल्याचे महापौर घोडेले म्हणाले.
इम्तियाज जलील यांची नौटंकी
कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या मशीनच्या निविदा टक्केवारी अडकल्याचा आरोप एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. आमदार जलील हे शहराचे आमदार आहेत. त्यांनी आतापर्यंत कोणती विकासाची कामे केली हे अगोदर सांगावे असा टोला महापौरांनी लगावला. मनपाला कोणतेही सहकार्य न करता केवळ आरोप करणे बरोबर नसल्याचेही ते म्हणाले.
तो निर्णय भाजपचा
मनपामध्ये भाजप फरफटत जाणार नाही असे भाजपचे प्रवक्ते शिरीष बोराळकर यांनी म्हटले आहे. याकडे लक्ष वेधले असता कचरा प्रश्नावरून कोंडी होत असेल तर सत्तेत राहायचे की नाही याचा विचार त्यांनी करावा. निर्णय त्यांचा आहे असे महापौर म्हणाले. या पत्रकार परिषदेला सभापती राजू वैद्य, सभागृह नेता विकास जैन, मनपा गटनेता मकरंद कुलकर्णी, नगरसेवक राजेंद्र जंजाळ, सीताराम सूरे आदींची उपस्थिती होती.































































