टीव्ही चॅनलवर यापुढे देवदेवतांच्या यंत्र-तंत्राच्या जाहिराती दाखवू नका!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देवदेवतांच्या नावाचा सर्रास वापर करून सर्वसामान्यांच्या गळ्यात यंत्र तंत्र मारणाऱया व्यावसायिकांना मुंबई उच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. लोकांच्या श्रद्धेचे बाजारीकरण थांबवण्यासाठी महाराष्ट्रात यापुढे टीव्ही चॅनल्सवर देवदेवतांच्या, यंत्रतंत्राच्या जाहिराती दाखवू नका असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने राज्य सरकारला दिले आहेत.

विविध चॅनल्सवर पुन्हा अशा जाहिराती झळकू नयेत यासाठी मुंबईत विशेष कक्ष (सेल)स्थापन करून अघोरी कृत्य आणि काळी जादू कायद्यानुसार संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना खंडपीठाने दिल्या आहेत.

काही विशेष चॅनल्सवर धर्माच्या नावाखाली हनुमान चालिसा, देवीचे यंत्र यासारख्या वस्तूंच्या जाहिराती दाखवल्या जातात. यामुळे महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांची भोंदूगिरीच्या माध्यमातून लूट होत आहे.राज्य शासनाच्या 2013 मधील अघोरी कृत्य आणि काळी जादू कायद्यानुसार प्रसार माध्यमांवर अशा जाहिरातींवरील प्रक्षेपणावर बंदी असतानाही या जाहिराती दाखवण्यात येत असल्याने संभाजीनगर येथील सिडको भागात राहणारे राजेंद्र अंभोरे या शिक्षकाने 2015 साली हायकोर्टाच्या संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल केली होती.

या याचिकेवर न्यायमूर्ती टी.व्ही.नलावडे व न्यायमूर्ती एम.जी. शेवलीकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी याचिकाकर्त्यांनी कोर्टाला युक्तिवाद करताना सांगितले की अंधश्रद्धा व भोंदूगिरीला वेसण घालण्यासाठी तसेच समाज प्रबोधन होण्यासाठी विज्ञानाप्रती ओढ निर्माण व्हावी,यासाठी कायदा करण्यात आला.

हा दावा इंदूर येथील टेलिमार्ट शॉपिंग नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड या वाहिनीच्या वतीने फेटाळून लावण्यात आला व कोर्टाला सांगितले की अघोरी कृत्य आणि काळी जादू कायदा 2013आणि टेलिव्हिजन नेटवर्क्स (नियामक) कायदा या प्रकरणात लागू होत नाही.जाहिरातीमध्ये नमूद केलेले विधी हिंदू प्रथेनुसार असून कोणत्याही जादूच्या प्रकारात मोजता येणार नाहीत.