वाईनवरील अबकारी बंधने उठवा, किसान ब्रिगेडची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेतकऱ्यांच्या फळ उत्पादनावर ‘वाईनरी’ चालते. या उद्योगाला चालना देण्यासाठी वाईन उत्पादनावर टाकलेली अबकारी बंधने उठवावीत, ‘वाईन’ला कृषी उत्पादनाचा दर्जा देऊन विविध सवलती आणि अनुदान देण्यात यावे. यासाठी नियमात बदल करून वाईनला ‘अॅग्री हेल्थ ड्रिंक’चा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी किसान ब्रिगेडने केली आहे.

सुपर मार्केटमध्ये ‘वाईन’ विक्रीला परवानगी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे किसान ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोहरे यांनी स्वागत केले आहे. ज्या शेतकऱ्यांच्या फळ उत्पादनावर वायनरी चालते त्यांना चालना देण्यासाठी हा निर्णय फायद्याचा आहे. ‘वाईन’ला अबकारी विभागाऐवजी कृषी प्रक्रिया उद्योगात आणावे यासाठी किसान ब्रिगेड पाठपुरावा करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हिंदुस्थानात वाईन हे पेय ‘अबकारी’ विभागाअंतर्गत असल्यामुळे त्यावर आधारित प्रक्रिया उद्योगांवर ‘लायसन्स परमिट राज’अंतर्गत बंधने आली आहेत. आज विविध फळांचे विपुल उत्पादन होते, मात्र जाचक अटींमुळे फळांवर आधारित या उद्योगात शिरण्यास शेतकरी धजावत नाहीत. परिणामी कृषी उत्पादन असलेली फळे वाया जाऊन शेतकऱयांचं प्रचंड नुकसान होत असल्याकडे किसान ब्रिगेडने एका निवेदनाद्वारे सरकारचे लक्ष वेधत वाईनरी उद्योगावरील अबकारी बंधने उठविण्याची मागणी केली आहे.

दारू दुकानावरील ‘वाईन’ ही अक्षरे हटवून ‘लिकर शॉप’ लिहा
वाईन हे खरे तर ‘हेल्थ ड्रिंक’ आहे, मात्र दारू दुकानांना ‘लिकर शॉप’ऐवजी शब्दच्छल करीत ‘वाईन शॉप’ असे गोंडस नाव दिल्यामुळे ‘वाईन’बद्दल समाजात अनेक गैरसमज पसरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे व्यापक हित लक्षात घेऊन दारू दुकानवरील ‘वाईन’ ही अक्षरे हटवून त्याऐवजी ‘लिकर शॉप’ असं लिहिण्याची सक्ती कायद्याने करण्यात यावी, अशी मागणी किसान ब्रिगेडने केली आहे.