निवडणूक आयोगाचा भाजपला धक्का, लसीच्या सर्टिफिकेटवरून पंतप्रधानांचा फोटो हटविण्याचे आदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवर छापलेला आहे. त्यावरून तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करत हा आचारसंहितेचा भंग असल्याचे म्हटले होते. तृणमूलच्या या तक्रारीची दखल घेत निवडणूक आयोगाने भाजपला धक्का दिला आहे. आचार संहिता लागू असलेल्या राज्यांमध्ये लसीच्या सर्टिफिकेटवरील पंतप्रधानांनाचा फोटो तत्काळ हटवावा असे आदेश केंद्र सरकारला दिले आहेत.

निवडणूक आयोगाने आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाला पत्र लिहून पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ व पुदुच्चेरी या राज्यातील लसीच्या सर्टिफिकेटवरील पंतप्रधांनाचा फोटो व त्यांचे नाव हटविण्यास सांगितले आहे. पंतप्रधांनाचा सर्टिफिकेटवर फोटो असणे हा आचारसंहितेच्या नियमांचा भंग असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी लसीच्या सर्टीफिकेटवरील मोदींच्या फोटोबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.

लस घेतानाच्या फोटोचे होर्डिंग्जही लावले हटवायला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याच्या पहिल्या दिवशी कोरोनाची लस घेतली. त्यानंतर त्यांचे लस घेतानाचे व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. या लस प्रकरणाचा फायदा पश्चिम बंगालमधील निवडणूकीत घेण्यासाठी भाजपकडून ठिकठिकाणी मोदींचा लस घेतानाच्या फोटोचे होर्डिंग्स लावण्यात आले होते. मात्र याबाबत तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून आयोगाने भाजपला सदर पोस्टर 72 तासात हटविण्याचे आदेश दिले आहेत.  पश्चिम बंगालमध्ये अनेक पेट्रोल पंप, बस व रेल्वे स्थानकांवर तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लस घेतानाचे होर्डिंग्ज लावलेले होते.

आपली प्रतिक्रिया द्या