वरळीतील सरकारी निवासी इमारतींची दुरुस्ती करा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

अतिवृष्टीमुळे वरळीतील शासकीय निवासस्थान इमारत असलेल्या ‘दर्शना’ या इमारतीचा स्लॅब कोसळला. येथील टेरेस फ्लॅटमध्ये पाण्याच्या धारा लागल्या आहेत. तेथील मोटररूमचा स्लॅबदेखील अतिवृष्टीमुळे कोसळला होता. सरकारी निवासस्थान असलेल्या इमारतींची दुरवस्था झाली असून सरकारने यांची दुरुस्ती व डागडुजी तत्काळ करावी, अशी मागणी शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी केली.

‘दर्शना’ इमारतीप्रमाणेच वरळी मतदारसंघातील ‘शीतल’, ‘स्नेहा’, ‘गगनमहल’, ‘गंगा’ अशा शासकीय निवासस्थान असलेल्या इमारतींची दुरवस्था झाली आहे. येथील रहिवासी बऱयाच वर्षांपासून इमारत दुरुस्तीची मागणी करीत असून सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याकडे औचित्याच्या मुद्दय़ाद्वारे सुनील शिंदे यांनी लक्ष वेधले. येथील वरळी सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता एक वर्षाच्या आत बदली होऊन जातो. यामागे काय गौडबंगाल आहे त्याची चौकशी करण्यात यावी. त्याचप्रमाणे ‘दर्शना’ इमारतीतील घटनेची दखल घेऊन सरकारने तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सुनील शिंदे यांनी केली.