
राजापूरच्या बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणाऱया कार्यकर्त्यांवर मिंधे सरकारची दडपशाही अद्याप सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज रत्नागिरी दौऱयावर होते. बारसू रिफायनरीविरोधी संघटनेचे कार्यकर्ते त्यांना निवेदन देण्यासाठी जाणार होते, परंतु तत्पूर्वीच राजापूर पोलिसांनी त्यांना सक्तीने ताब्यात घेतले.
बारसूच्या सडय़ावर रिफायनरी प्रकल्प उभारण्याचा घाट मिंधे सरकारने घातला आहे, मात्र त्याला पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला आहे. बारसू-सोलगाव पंचक्रोशी रिफायनरीविरोधी संघटना सातत्याने आंदोलन करत आहे, मात्र मुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्यांनी अद्याप त्यांना भेट दिलेली नाही. आज रत्नागिरी दौऱयावर असलेल्या मुख्यमंत्री शिंदे यांना भेटण्यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱयांचे शिष्टमंडळ जाणार होते. त्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. या कारवाईचा रिफायनरीविरोधी आंदोलकांनी निषेध केला आहे. सरकारच्या दडपशाहीला भीक न घालता संघर्ष सुरूच राहील, असा निर्धारही आंदोलकांनी व्यक्त केला.
उदय सामंत यांच्या दबावामुळे कारवाई
पालकमंत्री उदय सामंत यांच्या दबावामुळे पोलीस प्रशासनाने आम्हाला ताब्यात घेतले, असा आरोप रिफायनरीविरोधी संघटनेच्या पदाधिकाऱयांनी केला आहे.
























































