रिपब्लिक चॅनलचे सीएफओ चौकशीसाठी गैरहजर; पोलिसांकडे मागितली आठवडाभराची मुदत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीआरपी घोटाळ्यात मुंबई पोलिसांनी कारवाईचा वेग वाढविल्यानंतर आता रिपब्लिक चॅनलचे धाबे आणखी दणाणले आहे. पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजाविल्यानंतर रिपब्लिक चॅनलचे सीएफओ शिवा सुंदरम गैरहजर राहिले. याप्रकरणी त्यांनी पोलिसांकडे मुदत मागितली आहे. आपण सर्वोच्च न्यायालयात जात असून येत्या आठवड्याभरात यावर निकाल येणे अपेक्षित असल्याने अद्याप याप्रकरणाची चौकशी करु नका, अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे. सध्या आपण प्रवासात असून चौकशीसाठी येऊ शकत नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी रिपब्लिक चॅनेलचे सीएफओ शिवा सुंदरम यांना शुक्रकारी चौकशीसाठी समन्स बजाविले होते. तर फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा या चॅनेल्सच्या काही अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले होते. परंतु सर्वांचे लक्ष हे रिपब्लिक चॅनेलच्या सीएफओच्या चौकशीकडे लागून राहिले होते. मात्र ते शनिवारी ते या चौकशीसाठी हजर राहू शकले नाहीत.

दरम्यान, याप्रकरणी न्यायालयाने फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमाच्या मालकांना 13 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याशिवाय मुंबई पोलिसांनी जाहिरात देणाऱ्या काही एजन्सीच्या अधिकाऱ्यांना देखील चौकशीसाठी बोलाविले आहे. तर दुसरीकडे पोलीस तपासादरम्यान हंसा रिसर्चचा माजी कर्मचारी विशाल भंडारी यांच्या डायरीतून अधिक खुलासे झाल्याची माहिती समोर आली आहे. ज्यात प्रामुख्याने कोणाकोणाला पैसे दिले आहेत, याची माहिती समोर आली आहे.

आतापर्यंत चार जणांना अटक
याप्रकरणी मुंबई पोलिसांनी सर्वप्रथम विशाल भंडारीला अटक केली. विशाल भंडारी हा टीआरपी एजेंसीसाठी काम करणाऱ्या हंसा कंपनीचा माजी कर्मचारी आहे. कोणकोणत्या टीव्हीमध्ये बॅरोमीटर बसविण्यात आले आहेत. याची माहिती विशालला होती. त्याशिवाय संजू राव याला देखील अटक करण्यात आली आहे. विशाल आणि संजू हे दोघे बॅरोमीटर लावलेल्या घरात रिपब्लिक टीव्ही आणि इतर दोन चॅनेल पाहण्यासाठी पैसे देत असल्याचे कळते. पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत एकूण चार जणांना अटक केली आहे. ज्यात फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा या चॅनेल्सच्या मालकांचा ही समावेश आहे.