
पूरस्थितीत आपत्कालीन व्यवस्थेवर अवलंबून न राहता युवकांच्या मदतीने पूरग्रस्तांना मदत करता यावी म्हणून संगमेश्वरमधील युवापिढी विविध उपाययोजना करीत आहे. त्याचाच भाग म्हणून पूरस्थितीत आपत्कालीन साहित्य जमा केले जात आहे. पूरस्थितीत अडकलेल्यांना वाचविण्यासाठी संगमेश्वरवासीयांना आता गोव्यातील एका उद्योजकाकडून बोट मिळाली आहे .
संगमेश्वर, रामपेठ नदी किनारी असल्याने पूर परिस्थितीमध्ये बचाव कार्यासाठी बोटीची गरज होती. काही दिवसांपूर्वी ऋतुराज स्पोर्टस् अकॅडमी यांच्याकडून बचाव कार्यासाठी लागणारे साहित्य लाईफ जॅकेट, बोया, मोठी रस्सी, बॅटरी संगमेश्वरसाठी देण्यात आली आहे. तसेच बावीस फूटी मोठी शिडी पूजा एजन्सीजचे मालक मंगेश बुर्शे यांनी उपलब्ध करून दिली आहे. आता संगमेश्वरला बोटीची आवश्यकता होती.
यासाठी सामाजिक कार्यकर्ते अमोल शेट्ये यांनी पुढाकार घेतला. गोवा येथील उद्योजक रेखा दिपक विरा आणि दिपक लाजली विरा यांनी बोटीची गरज लक्षात घेत सोळा माणसं बसू शकतात अशी बोट संगमेश्वरवासियांना उपलब्ध करून दिली आहे. यासाठी रामपेठ येथील युवा कार्यकर्ते अमोल शेट्ये यांनी पाठपुरावा केला होता . या बोटीचे नुकतेच सुवासिनींच्या हस्ते पूजन करण्यात आले .
























































