
सामना प्रतिनिधी । सोलापूर
जिल्ह्याची वरदायिनी समजल्या जाणाऱ्या उजनी धरणातील पाण्यावर सोलापूर विद्यापीठाचे संशोधन सुरू झाले आहे. धरणबाधित गावे व कुटुंबांचा अभ्यास व सर्वेक्षण यामध्ये असणार आहे. याबरोबरच उजनीतील पाण्याचा मानवी आरोग्य व निसर्गावर होणारा परिणाम याविषयीही संशोधन करण्यात येणार आहे.
सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची सूत्रे हाती घेताच, कुलगुरू प्रा. डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी उजनी धरणावर संशोधन करण्याचे ठरविले. या संशोधनाची मुख्य जबाबदारी सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक डॉ. गौतम कांबळे यांच्याकडे सोपविली आहे. पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. व्ही. पी. धुळप, रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. एम. जी. माळी हेही त्यासाठी साहाय्य करीत आहेत.
उजनी धरणामुळे सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांतील ५१ गावे आणि ४७ हजार कुटुंबे बाधित झाली. यातील ५ गावे व २३५ कुटुंबांचे सर्व्हेक्षण सोलापूर विद्यापीठाकडून केले जाणार आहे. यासाठी सोलापूर व पुणे जिल्ह्यातील प्रत्येकी दोन आणि नगर जिल्ह्यातील एका गावाची निवड करण्यात येणार आहे. उजनी धरण झाल्यानंतर कसे बदल झाले व बाधित कुटुंबाची सद्यस्थिती काय आहे, हे या संशोधनातून जाणून घेतले जाणार आहे. दोन वर्षांच्या कालावधीत हे संशोधन करण्यात येणार असल्याचे डॉ. कांबळे यांनी सांगितले.
उजनी धरणामुळे सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत फार मोठे बदल झाले आहेत. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या पाण्याच्या साठवणुकीमुळे इंडस्ट्रिजची संख्या वाढण्याबरोबरच औद्योगिक क्रांतीही झाल्याचे दिसून येते. मात्र, असे असताना धरणात रसायनमिश्रित पाणी आढळून येते. याचा विपरीत परिणाम मानवी आरोग्य व निसर्गावर होताना दिसून येत आहे. त्यामुळे उजनी धरणातील पाण्याचे संशोधन महत्त्वाचे असून, ते कार्य सोलापूर विद्यापीठातील संशोधकांकडून केले जाणार असल्याचे सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी सांगितले.
उजनी धरणातील विविध ११ ठिकाणांहून पाण्याचे नमुने तपासणीला घेतले आहेत. सोलापूर विद्यापीठातील रसायनशास्त्र व पर्यावरणशास्त्र संकुलात या पाण्याची तपासणी सुरू झाली आहे. प्राथमिक अंदाजानुसार उजनीतील पाणी मानवी आरोग्य व शेतीसाठी अपायकारक असल्याचे निष्कर्ष येत आहेत.






























































