फिटनेस तिच्या घरात!

2510

>> वरद चव्हाण

रेशम टिपणीस. तंदुरुस्ती तिच्या रक्तात आणि घरात. अनेक मर्यादा असूनही तिने फिटनेसची वाट कधीच सोडली नाही.

नमस्कार फिटनेस फ्रिक्स! आजवर आपण हॉलीवूड आणि बॉलीवूडमध्ये अशा अनेक हिरॉईन बघितल्या, ज्यांना आपण खऱया अर्थाने ‘द दिवा’ म्हणू शकतो! बॉलीवूडमध्ये 70, 80, 90 चा काळ गाजवणाऱया परवीन बाबी, झीनत अमान, किमी काटकर, सोनाली बेंद्रे, ममता कुलकर्णी अशा अनेक अभिनेत्रींनी रसिकांच्या मनात फक्त अभिनयानेच नव्हे तर त्यांच्या सौंदर्यामुळेसुद्धा घर केले. याच काळात एक अशी मराठमोळी दिवा रुपेरी पडद्यावर आली. जिने वयाच्या 16 व्या वर्षी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं, तेव्हापासून ते आतापर्यंत फॉर्टीज् क्लबमध्ये असतानासुद्धा अनेक तरुणांची फेवरेट म्हणून राज्य करणारी आजची आपली सेलिब्रिटी कलाकार किंबहुना द वन ऍण्ड ओनली दिवा ऑफ मराठी इंडस्ट्री रेशम टिपणीस! जवळजवळ तीस वर्षे रेशम मराठी व हिंदीमध्ये सातत्याने काम करत आहे! फिट राहण्यासाठी ही नेमकं करते काय, असा प्रश्न अनेकांना पडणे साहजिक आहे, पण रेशमचा फिट राहण्याचा फंडा वेगळाच आहे! आपल्याला आयुष्य एकदाच मिळतं. त्यामुळे ‘लिव्ह लाइफ टू द फुलेस्ट’ या मताची ती आहे. पाळीव प्राण्यांची तिला लहानपणापासूनच खूप आवड. मांजर, कुत्रे पाळायला तिला खूप आवडतं. आता पाळीव प्राणीप्रेमींना त्यांच्या लाडक्या प्राण्यांना त्यांचं नाव न घेता नुसतं मांजर आणि कुत्रे असा उल्लेख करणं अजिबात आवडत नाही याची जाणीव मला आहे. म्हणून मी आधीच त्यांची माफी मागतो. पण रेशमचा हाच पाळीव प्राणी पाळण्याचा छंद तिचा फिटनेस फंडा ठरला. लहानपणापासूनच स्वतःच्या डॉगीसोबत शिवाजी पार्कवर जॉगिंग करणं, कधी कधी स्वतः सायकलिंग करत त्याच्या मागे मागे जाणं… थोडक्यात काय तर त्याच्या मागोमाग किंवा त्याला सांभाळण्यात रेशमचं पण धावणं आणि सायकल चालवणं नित्यनेमाने होत होतं. वाढत्या वयात सायकल आणि जॉगिंगसारखा उत्तम व्यायाम नाही. सायकलिंग आणि जॉगिंगला जोड होती ती टेनिस आणि भरतनाटय़मची. टेनिसमुळे आपला स्टॅमिना वाढतो, रिलॅक्सेशन चांगले होतात. हॅण्ड, आय को-ऑर्डिनेशन चांगलं होतं. याशिवाय कोअर म्हणजेच पोटाचे स्नायू, लोअर बॉडी म्हणजेच मांडय़ा, पोटऱयासुद्धा मजबूत होतात. याशिवाय भरतनाटय़ममुळे बॉडी बॅलन्स व बॉडी पोश्चर छान होतं. थोडक्यात काय तर, एक फिट आणि उत्तम आयुष्याचा पाया लहानपणीच रचला गेला होता. जसा रेशमला काम मिळवण्यासाठी स्ट्रगल करावा लागला नाही तसाच फिट राहण्यासाठीसुद्धा नाही. रेशमचा मेटाबॉलिझम रेट उत्तम आहे. याशिवाय स्लिम शरीरयष्टीसुद्धा तिच्या जीन्समध्ये म्हणजेच हेरिडेटरी आहे. रेशमला एकदाच बारीक होण्याची गरज भासली ती म्हणजेच तिच्या दुसऱया मुलाची डिलिव्हरी झाल्यानंतर. तेव्हा रेशमचे वजन साधारण 75 किलो झाले होते. याशिवाय डिलिव्हरीमध्ये अनेक कॉम्प्लिकेशन्स झाले होते, ज्यामुळे तिच्या कंबरेवर खूप प्रेशर येऊ लागलं आणि तिला स्लिप डिस्कसुद्धा झाली होती. मूल झाल्याचा आनंद होतोच, पण आता स्वतःकडे लक्ष देणंसुद्धा अनिवार्य होतं. वाढलेल्या वजनाचा ताण कंबरेवर येतच होता, पण गुडघेसुद्धा आता त्रास देऊ लागले होते. इतक्या समस्या असताना जिमला जाऊन वजन उचलणं आऊट ऑफ ऑप्शन होतं. सायको थेरपिस्टच्या मदतीने हळूहळू तब्येतीत सुधारणा झाली, पण नुसतं सायको थेरपीनी वजन कमी होणार नव्हतं. डाएट करणं तिला अजिबात आवडत नाही आणि म्हणून तिने पर्याय निवडला स्वीमिंगचा. 45 मिनिट रोज पोहणं हा तेव्हा तिच्या आयुष्याचा भाग झाला. मानसिक शांततेसाठी पॉवर योगाचा मार्ग निवडला, पण अजूनही रेशमला स्वतःला जपावं लागतंच. आताही ती बसल्यावर पटकन उठू शकत नाही. आधार घेऊनच उठावं लागतं. थंडी जवळ आली की दरवर्षी हा त्रास डोकं वर काढतो. पण समस्यांना घाबरणारी रेशम नाहीच आणि म्हणूनच तिने पिलाटीज चालू केले आहे. एक दिवसआड तरी ती नक्कीच हा वर्कआऊट करते. या वर्कआऊटमुळे ऍबडॉमीनल मसल्स आणि लोअर बॅक मजबूत होतात. आता खाण्याचं विचाराल तर मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे तिला डाएट करायला अजिबात आवडत नाही. रेशम प्युअर सीकेपी असल्यामुळे ती प्युअर मासेखाऊ आहे असे म्हणायला हरकत नाही. मासे आणि मटण खायला प्रचंड आवडते. आमच्यासारखे इतर मासेखाऊ जसे आज चिकन आणि मासे खाऊन कंटाळा आला, आज जरा शाकाहारी खाऊ असं म्हणतो. पण रेशमचे उलट आहे. ती म्हणेल मासे आणि मटण खाऊन कंटाळा आला, आज जरा चिकन खाऊ. कुकिंगची तिला प्रचंड आवड आहे. शूटलासुद्धा स्वतः केलेले जेवण फक्त स्वतःसाठीच नव्हे, तर इतरांसाठीसुद्धा आणते. गोड खाणं तिला अजिबात आवडत नाही. रेशम जरी व्यायाम किंवा डाएट करत नसेल तरी तिने सुरुवातीला केलेला सायकलिंग, जॉगिंग, स्वीमिंगचा तिला खूप फायदा झालाय एवढे मात्र नक्की!

z [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या