निर्बंध अधिक कडक होणार; आदित्य ठाकरे यांनी महापालिकेत घेतला आढावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत आठवडाभरापूर्वी दीडशेपर्यंत असणारी दैनंदिन रुग्णसंख्या आता थेट अडीच हजारांवर गेली आहे. यामुळे कोराना फैलावण्याचा धोका अधिक वाढला असून रुग्णांची संख्या पाहता वर्षअखेरीच्या जल्लोष गर्दीमुळे मोठय़ा प्रमाणावर संसर्ग होण्याची भीती आहे. त्यामुळे पाटर्य़ांवर बंदी घालण्यात आली असून हॉटेल-रेस्टॉरंटमध्ये नियम मोडल्याचे आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. वेळ पडल्यास अशी हॉटेल्स सील केली जावीत, असे निर्देश पर्यटन आणि उपनगर जिह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले.

मुंबईत वाढणाऱया कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी आज पालिका प्रशासनासोबत महत्त्वपूर्ण बैठक घेऊन आरोग्य सुविधेचा आढावा घेतला. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर, उपमहापौर अॅड. सुहास वाडकर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, पी. वेलरासू, सुरेश काकाणी आदी मान्यवर उपस्थित होते. सद्यस्थितीत होणारी रुग्णवाढ ही तिसरी लाट असू शकते, अशी शक्यताही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली. त्यामुळे प्रत्येकाने कोरोना खबरदारी घ्यावी, मास्क वापरावा, वारंवार हात धुवावे, सॅनिटायझरचा वापर करावा, शक्यतो दोन मास्क लावावेत, लसीकरण लवकरात लवकर करून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. ओमायक्रोन घातक नसल्याचे मेसेज व्हायरल होत आहेत. यावर किती विश्वास ठेवावा हे प्रत्येकाने ठरवावे. या स्थितीमुळे पॅनिक होण्याची गरज नसली तरी वेगाने वाढणारी रुग्णसंख्या पाहता काळजी घेणे अनिवार्यच असल्याचेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

हॉटेल–रेस्टॉरंटमधील सीसीटीव्ही तपासणार

  • कोरोना निर्बंध आणखी कठोर करण्याबाबत पुढील आठवडय़ात परिस्थिती पाहून राज्य सरकार निर्णय घेणार आहे. मात्र तोपर्यंत प्रत्येकाने कोरोना खबरदारी काटेकोरपणे पाळणे अनिवार्य आहे.
  • हॉटेल-रेस्टॉरंटमध्ये नियम पाळले जात आहे की नाही याच्या खात्रीसाठी त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार आहे. शिवाय पालिकेची भरारी पथके पोलिसांच्या सहाय्याने कारवाई करणार आहेत.

3 जानेवारीपासून मुलांचे लसीकरण

मुंबईत 15 ते 18 वर्षे वयोगटाचे लसीकरण 3 जानेवारीपासून सुरू करण्यात येणार आहे. यासाठी पालिकेने पूर्ण तयारी केली असून शाळा-कॉलेज परिसरात लसीकरण करण्यात येणार आहे. शाळा सुरू ठेवण्याबाबतचा निर्णयही पुढील आठवडय़ातील कोरोना स्थिती पाहून राज्य सरकार घेईल, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

‘यूएई’तून येणाऱया प्रवाशांना सात दिवस सक्तीचे होम क्वारंटाइन

 संयुक्त अरब अमिराती देशांमधून मुंबई विमानतळावर येणाऱया प्रवाशांना येण्यापूर्वी आरटी-पीसीआर चाचणी व सात दिवस सक्तीचे होम क्वारंटाइन करण्यात येणार आहे. शिवाय हवाईमार्गे मुंबईत येणाऱया लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधित प्रवाशांसाठी बीकेसी आणि नेस्को कोविड केंद्रात स्वतंत्र निःशुल्क व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी प्रत्येकी 500 बेड तैनात ठेवण्यात येतील. शिवाय मालाड आणि कांजूरमार्ग कोविड केंद्र तत्काळ कार्यान्वित करण्यातचे निर्देश पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी आज पालिका प्रशासनाला दिले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन दिवसांत घेणार बैठक

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून आणखी कडक निर्बंध लावण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, टास्क फोर्स आणि आरोग्य विभाग यासंबंधी एकत्रितपणे निर्णय घेतील. मुख्यमंत्र्यांनी मंगळवारच्या बैठकीत टास्क फोर्सची बैठक घेऊन वाढत असलेला पॉझिटिव्हिटी रेट, रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासंबंधी सूचना दिल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आज किंवा उद्या बैठक होणार असून निर्बंध अजून वाढवण्यासंबंधी निर्णय घेतला जाऊ शकतो. यासाठी टास्क फोर्सचे मत विचारात घेतले जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

ओमायक्रोन करणार कोरोनाचा खात्मा

डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रोनला फुप्फुसात शिरण्यास उशीर लागत असल्याने तो श्वसननलिकेत अधिक काळ राहतो. श्वसननलिकेत ‘म्युकोसल’ ही रोगप्रतिकारक प्रणाली कार्यरत असते. या ठिकाणी अँटीबॉडी निर्माण होते. याला ‘इम्युनोग्लोबुलिन आयजीए’ म्हणतात. त्यामुळे फुप्फुसात शिरण्याआधीच कोरोनाच्या विषाणूचा खात्मा होतो. जेवढय़ा जास्त लोकांमध्ये ओमायक्रोनचा प्रसार होईल तेवढय़ा लवकर कोरोनाचा खात्मा होईल, असा दावा ब्रिटिश मेडिकल कॉन्सिलचे माजी वैज्ञानिक डॉ. राम. एस. उपाध्याय यांनी केला आहे.

54 हजार बेड तैनात

कोरोना आणि ओमायक्रोनचा धोका लक्षात घेऊन मुंबईत 54 हजार बेड तैनात करण्यात आले आहेत. मुंबईतील सर्व कोरोना केंद्रांना अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या ठिकाणी आवश्यक ती औषधे, उपकरणे तसेच मनुष्यबळ तैनात ठेवण्यात आले आहे.

9 महिन्यांनी बुस्टर डोस

कोरोनाचा पुन्हा वाढलेला प्रसार पाहता नऊ महिन्यांनी आरोग्य कर्मचारी, प्रंटलाइन वर्कर आणि ज्येष्ठांना बुस्टर डोस देण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल. यासाठी आवश्यक डेटा गोळा करण्याचे काम सुरू करण्यात आल्याची माहितीही आदित्य ठाकरे यांनी दिली.