
मुंबईसह देशभरात कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आल्यामुळे पडझड झालेल्या रिटेल व्यवसायाची गाडीही आता पूर्वपदावर येत आहे. सप्टेंबर 2021 महिन्यात विक्रीत 96 टक्के इतकी मोठी वाढ झाली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत 26 टक्के जास्त वाढ नोंदवली गेली आहे. रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या (आरएआय) अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
देशभरात कोरोनाची लाट नियंत्रणात आल्यामुळे रिटेल उद्योगावरही त्याचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळत आहेत. इलेक्ट्रॉनिक्स, फूड आणि ग्रोसरीज, क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट अशा रिटेल उद्योगातील विविध सेक्टरमध्ये आता सकारात्मक वातावरण पाहायला मिळत आहे. रिटेल असोसिएशन ऑफ इंडियाचे सीईओ कुमार राजगोपालन म्हणाले, कोरोनामुळे मंदावलेल्या रिटेल क्षेत्रात आता सुधारणा होत आहे. कोरोनापूर्वीच्या काळात ज्या प्रकारे उलाढाल व्हायची तशीच आता पाहायला मिळतेय. दसरा, दिवाळी अशा सणासुदीच्या काळात किरकोळ व्यवसायात मोठी उलाढाल पाहायला मिळेल.

























































