लाच प्रकरणात शिक्षा झालेल्या निवृत्त हवालदाराची आत्महत्या, कृष्णा नदीच्या पुलावरून मारली उडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुह्यात मदत करण्याच्या मोबदल्यात लाच घेतल्याप्रकरणी निवृत्त पोलीस हवालदारास न्यायालयाने एक वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली होती. शिक्षा झाल्याच्या नैराश्यातून या निवृत्त पोलीस हवालदाराने अंकली येथील कृष्णा नदीच्या पुलावरून नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी (दि. 21) दुपारी ही घटना घडली आहे. या घटनेची नोंद सांगली ग्रामीण पोलिसांत झाली असून, मृतदेहाचा शोध नदीपात्रात पोलिसांनी सुरू केला आहे.

अशोक नामदेव कांबळे (वय 64, रा. सांगली) असे मृताचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी कांबळे यांनी मुलीला व्हिडीओ कॉल केल्यानंतर त्यांनी नदीत उडी घेतली.

तक्रारदाराची लाकडाची वखार आहे. यासाठी ते झाडे तोडून लाकूड मिळवत होते. झाड तोडत असताना कामगाराचा झाडावरून पडून मृत्यू झाला होता. सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद होती. या प्रकरणाचा तपास कांबळे यांच्याकडे होता. खटल्यात मदत करण्यासाठी कांबळे यांनी दहा हजार रुपयांची लाच मागून चार हजार रुपये कमी केले. यानंतर फिर्यादीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. 8 जानेवारी 2012 रोजी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या आवारातच कांबळे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. तपास करून कांबळेंविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. न्यायालयाने कांबळे यांना दोषी ठरवत एक वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. शिक्षा सुनावल्यानंतर कांबळे नैराश्येत गेले होते. गुरुवारी सकाळी ते घरातून बाहेर पडले. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अंकली येथील कृष्णा नदीच्या पुलावर ते आले. त्यांनी या ठिकाणाहून त्यांच्या मुलीला व्हिडीओ कॉल केला आणि मी आत्महत्या करत असल्याचे सांगून फोन ठेवला. यानंतर त्यांनी नदीत उडी घेतली. या प्रकारानंतर त्यांच्या मुलीने पोलिसांत धाव घेतली.

घटनेचे गांभीर्य ओळखून सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱयांनी पुलावर धाव घेतली असता, तेथे कांबळे यांची चप्पल आढळली. यानंतर हेल्पलाईन टीमच्या मदतीने मृतदेहाचा शोध सुरू करण्यात आला. सध्या कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने मृतदेह म्हैसाळजवळ वाहून गेल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. उपविभागीय अधिकारी अजित टिके, निरीक्षक शिवाजी गायकवाड यांच्यासह पथकांनी नदीपात्रात शोधमोहीम राबविली. मात्र, मृतदेह आढळला नाही.