
तलाठय़ांपासून उपजिल्हा अधिकाऱ्यांपर्यंतच्या कामचुकार अधिकाऱ्यांना महसूल खात्याने दणका दिला आहे. त्यांना कामाच्या ठिकाणीच फेसअॅपवरून नियमित हजेरी लावणे सक्तीचे करण्यात आले असून हजेरी लावली नाही तर संबंधित अधिकारी कामावरच नव्हता, असे गृहित धरून पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
ग्रामीण भागात तलाठी जागेवर सापडणे म्हणजे दिव्यच समजले जाते. अनेक तलाठी नेमणुकीच्या ठिकाणी हजरच नसतात. त्यामुळे सामान्य जनतेला सातबारा, फेरफार नोंदणी, उत्पन्न प्रमाणपत्रे, जमीन मोजणी व अन्य महत्त्वाच्या कामांसाठी नाहक हेलपाटे घालावे लागतात. पह्न केला तर तलाठय़ाकडून आपण दुसऱ्या गावात आहोत असे उत्तर नेहमीचेच झाले आहे. तलाठीच नव्हे तर तहसीलदार आणि उपजिल्हाधिकाऱ्यांपर्यंतचे अधिकारीही कधी कर्तव्याच्या ठिकाणी उपस्थित नसतात अशा अनेक तक्रारी सरकारकडे आल्या होत्या.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनपुळे यांनी त्यावर उपाय म्हणून महसूलच्या अधिकाऱ्यांना रोज फेसअॅपद्वारे हजेरी लावण्याचे फर्मान जारी केले आहे. ऑगस्ट महिन्यापासून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. रायगड जिह्यातील महसूल विभागाशी संबंधित कामांचा आढावा बावनपुळे यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेतला. त्यावेळी त्यांनी हा आदेश जारी केला.