कविता मनामनातली – ढासळलेल्या मूल्यांचा लेखाजोखा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> गीतेश शिंदे 

कवी विजय चोरमारे हे मराठी कवितेतलं आश्वासक नाव. ‘पापण्यांच्या प्रदेशात’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह 1989 मध्ये प्रकाशित झाला. त्यानंतर ‘शहर मातीच्या शोधात’ (1999), ‘आतबाहेर सर्वत्र’ (2007) या मधल्या दोन कवितासंग्रहांनंतर 2021 मध्ये प्रकाशित झालेल्या ‘स्तंभसूक्त’ या कवितासंग्रहातून कवीने बदलत्या दोन दशकांमधील ढासळलेल्या मूल्यांचा लेखाजोखा मांडला आहे. या संग्रहातील कवितांमध्ये माणूस केंद्रस्थानी असून झपाटय़ाने बदललेल्या समाजमनाचा ऊहापोहही त्यातून केलेला आढळतो. ‘पुढच्या पिढय़ांसाठी प्रश्न’ (पृ. ाढ. 31) या कवितेत नोकरीधंद्याच्या शोधात स्थलांतरित झालेल्यांचे प्रश्न कवी मांडताना दिसतो. गावाची नाळ तुटल्याची खंत तर त्यात आहेच, पण पोटाची खळगी भरण्यासाठी सुरू असलेली वणवणही त्यातून प्रकर्षाने येते. या कवितेतील काही ओळी पाहा :

ही चायनीजवर पोसलेली हायब्रिड जनरेशन
नॉस्टाल्जिक झुणका-भाकरीपुढे
यांच्या मूताला फेस कोकाकोलासारखा…

गांधीजींनी खरं तर ‘खेडय़ाकडे चला’ असा मूलमंत्र आपल्याला दिला होता, पण पोटापाण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी लोंढेच्या लोंढे या शहरांवर आदळताहेत. प्रत्येक जण इथे आपल्या स्वप्नांच्या शोधात आलेला, परंतु गर्दीचाच एक भाग बनून राहिलेले अनेक जण या गर्दीतच केव्हा हरवून जातात हेच समजत नाही. ही गर्दी चायनीज अथवा वडापाववर पोसली जातेय. कवी आपल्या कवितेतून नव्या पिढीसमोरचे अनेक प्रश्न व्यवस्थेला विचारतो आहे. या व्यवस्थेमध्ये फक्त तो शासनकर्त्यांनाच धारेवर धरत नसून मानवाच्या भोगवादी प्रवृत्तींवरही बोट ठेवतो आहे.

‘आर्टिकल 15’ (पृ. ाढ. 35) या कवितेत कवीने गावातल्या आणि शहरातल्याही विषमतेचे चित्र रेखाटले आहे. कवीने ही विषमता त्याच्या बालपणी अनुभवली आहे. काही ठिकाणी ती आजही कमी अधिक प्रमाणात आहे. आता नवी असहिष्णू विषमता सुरू झाली आहे असे कवी इथे नमूद करताना लिहितो ‘आजोळच्या सोप्याच्या दिवळीतले कप गायब झाले तशीच गावात मांडवाबाहेर उभी राहणारी माणसंही’.

पाणवठय़ावर पाण्यासाठी तासन्तास बाया उभ्या राहात. विहीर बाटल्याने बेदम मारले जाई, पण बाबासाहेबांच्या चळवळींमुळे कोटय़वधी माणसे स्वाभिमानी झाली. त्यांनी जुन्या प्रथा-परंपरा सोडल्या. माणसे शिकली, पण त्यामुळे सनातन्यांचा रागही त्यांनी ओढवून घेतला. आज त्या रागाचा हिंस्र आविष्कार खूप ठिकाणी दिसतो आहे. खालच्या जातीतला माणूस घोडय़ावर बसला, खालच्या जातीतल्या तरुणाने वरच्या जातीतील मुलीवर प्रेम केले की, सवर्णांचा अहंकार दुखावतो. या कवितेत अत्याचाराचे खूपसे संदर्भ आहेत; त्यातल्याच या काही ओळी पाहा –

जन गण मन म्हणताना रांगेत उभे राहा
स्वतंत्र रांगा करा आपापल्या जातीच्या

जातीभेदाची ही अमानुषता आजही आहेच. सत्तेचे दोर हाती घेणारे लोक संविधानाच्या मार्गाने चालण्याची शपथ घेतात, पण वास्तवात मात्र आपापल्या जातीत लोकांना विभागून त्यांना आपल्या टाचेखाली ठेवण्याचा त्यांचा एककलमी कार्पाम सुरू असतो. कवीला संविधानाचे सार्वभौमत्त्व माहीत आहे. म्हणूनच त्याने लिहिले आहे –

दगडविटा सिमेंटची वास्तू पाडण्याइतकं
सोपं नाही संविधानाची इमारत पाडणं

भारतीय संविधानाची महती कवी या ओळींतून विषद करतो. खूप कष्टाने मागच्या पिढय़ांनी हे सर्व उभारल्याची जाणीव त्याला आहे. म्हणून संविधान बदलण्याचे मनसुबे कवीला देशातील अल्पसंख्याकांना आणि स्त्रियांसकट सर्वच गोरगरीबांना मध्ययुगीन गुलामीत ढकलणारेच वाटतात.

नवऱ्याला एकच माहीत
बायको म्हणजे पोरं काढायचं मशीन
वंश वाढवायचं आणि लाथाबुक्क्यांचं हक्काचं ठिकाण

‘सत्संगाहून परतणाऱया बाया’ (पृ. ाढ. 46) या कवितेतील या वरील काही ओळींतून बायकांच्या जीवनातील कितीतरी दुःखे कवीने अधोरेखित केली आहेत. परकरी वयात आईबापांनी उरकून टाकलेले लग्न. बायको म्हणजे पोरं काढायचे, वंश वाढवायचे मशीन आणि लाथाबुक्क्यांचे हक्काचे ठिकाण असे पुरुषप्रधान संस्कृतीने बिंबवले आहे. यातून बाहेर पडण्याकरिता त्या सत्संग, कीर्तन, भजन अशा गोष्टींमध्ये आपले मन रमविण्याचा प्रयत्न करतात. या सत्संगाहून परतणाऱया बाया एसटीच्या बहुजनहिताय लाल गाडीत सत्संगात ऐकलेल्या परमार्थाच्या चर्चा करतात. परमार्थ आणि ऐहिकता यांचा झगडा कवीने या कवितेत मांडला आहे.

एकूणच विजय चोरमारे यांची कविता तार्किक आणि वस्तुनिष्ठ पायावर उभी असल्याचे जाणवते. या तर्कनिष्ठ जाणिवेत माणूसपण टिकले पाहिजे, लोकशाही मूल्यांचा सन्मान राखला गेला पाहिजे यासाठी कवी या कवितेतून ही आधुनिक सूत्ते देत आहे. शासन, प्रशासन, न्याय व्यवस्था, पत्रकारिता हे लोकशाहीचे चार स्तंभ, पण नव्या युगात कमी अधिक प्रमाणात हे चारही स्तंभ पोखरले गेल्याची खंत कवी कवितांमधून मांडतो आहे. या कवितासंग्रहाला ज्येष्ठ कवी यशवंत मनोहर यांची दीर्घ प्रस्तावना लाभली आहे. ते लिहितात, ‘या युगाचा नायकस्वर अभिव्यक्त करणारी ही सजग आणि सशक्त कविता आहे आणि ही संविधानाच्या मनातील पर्याय निर्मू इच्छिणारी कविताही आहे. सदसद्विवेकाने मोहोरलेल्या स्तंभावर उगवलेली सर्वांच्या सन्मानाची निपक्षपाती सूत्ते म्हणजे स्तंभसूत्ते.’

स्तंभसूक्त
विजय चोरमारे
प्रकाशक –लोकवाङ्मयगृह
पृष्ठे : 104, मूल्य : रु. 150/-