>> अरविंद दोडे
गझल! इस्लामच्या आधी इराणमध्ये ‘गझल’ हा काव्यप्रकार निर्माण झाला. सुफी संतकवींनी हा प्रकार गायिला. लोकप्रिय केला. संतकवी अमृतराय हे मराठीतले पहिले गझलकार! ‘जगव्यापका हरीला नाही कसे म्हणावे!’ ही त्यांची पहिली गझल, इसवी सन 1729 मध्ये लिहिली गेली. त्यानंतर कविराज मोरोपंत यांनी काही गझला लिहिल्या. मग माधव ज्युलियन यांनी 1925 ते 1934 या काळात गझल चळवळ उभारली. पुढे सुरेश भट हे 1975 ते 1995 या काळात आधुनिक गझलसम्राट झाले. 1997 पासून सुरेशचंद्र नाडकर्णी यांनी गझल पुढे नेली. भीमराव पांचाळे यांनी गझल-गायनाने अधिक लोकप्रिय केली तर डॉ. राम पंडितांनी गझल लेखनाचे व्याकरण अधिक विस्तृत केले. तंत्रशुद्ध गझलेस त्यामुळे अधिक महत्त्व आले. असंख्य गझलकार तयार झाले. त्यापैकीच एक आहेत गोविंद नाईक!
‘डोळय़ात आसवांच्या’ हा त्यांचा पहिला संग्रह गाजला. अनेक पुरस्कारप्राप्त ठरला. ‘डावा कोपरा’ हा दुसरा संग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. कवी हा द्रष्टा असतो, असे म्हणतात. तो भूत, भविष्य आणि वर्तमानाचा जाणकार म्हणून काळावर भाष्य करतो, पण तो ‘नेहमी कसल्या तरी तंद्रीत असतो की स्वतःच्या वास्तवाला भीत असतो, हा प्रश्न आदी-अनादी आहे.
‘केव्हातरी स्वतःहा कळतील माणसे।
आशेत याच अजूनी जगतात आरसे।।’
हा आशावाद कवी व्यक्त करतो. नेहमीप्रमाणे सामाजिक (डावा कोपरा)
कवितेतील ‘ते’ आणि आम्ही हा संघर्ष इथेही आहे. लढण्यासाठी ‘सूर्य जन्मास जर यायला पाहिजे। नभ कुणी ना कुणी व्हायला पाहिजे।।’ हा संदेश गृहित धरायला हवा. निष्कलंक समाजसेवक तसा दुर्मिळच! म्हणून ‘कुणीतरी सांगा भरकटलेल्या देहाला। तिळाएवढा डाग पुरेसा चारित्र्याला।।’
केव्हातरी असाही अनुभव येतो की, कवी मनाचा तळ गाठतो, अन् तिचा दरवळ हाती लागतो। दुसरी गोष्ट अशी की, ‘आतल्या गोष्टी कुठे कळती जगाला। लागले असतीलही चटके उन्हाला।।’ ही कठोर वास्तवता समजून घेताना कवी तिला प्रश्न करतो, ‘का खुले करतेस सगळे बारकावे। आरसे असतात काही आगलावे।।’ अशावेळी स्वतःला सावरण्याचा आटापिटा करावा लागतो. आपले-परके करावे लागते। ताकही फुंकून प्यावे लागते।।’ हे सत्यही नाकारता येत नाही. जीवघेण्या अनुभवांनी जीव कासावीस होतो. ‘संपली केव्हाच रक्तातील नाती। माणसे नाहीत, या आहेत जाती।।’ अधिक काय सांगायचे? कवी म्हणतो,
सांज आहे, चंद्र आहे अन् गझल आहे।
वेदनांची ही निघालेली सहल आहे।।
बस, आणखी काही नाही. या गझलांना मध्ययमक आहे. अंत्ययमक आहे. अशा तंत्रशुद्ध गझला मुक्तछंदांच्या बाजारात उठून दिसतात म्हणून दखलपात्र आहेत. थोडक्यात काय तर – ‘सलत असतो आजही ज्याचा तुला उजवेपणा। तोच मी आहे कोपऱयातील उजव्या गझला आहेत त्यांना दाद द्यायला हवी!
डावा कोपरा
लेखक – गोविंद नाईक
प्रकाशन – संवेदना प्रकाशन
पृष्ठs – 96 रंगीत किंमत – 170 रुपये



























































