संवेदनशील आगळी परिक्रमा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>उमेश घेवरीकर

परिक्रमा’ म्हणजे एखाद्या विषयाचा सांगोपांग अभ्यास करण्यासाठी घातलेली प्रदक्षिणा! शिक्षण हा कोणत्याही समाजाची जडणघडण आणि सर्वांगीण विकास घडवणारा महत्त्वाचा विषय. मात्र नेमका हाच विषय गेली काही वर्षे प्रचंड दुर्लक्षित, दिशाहीन आणि अनागोंदीने ग्रासलेला दिसून येतो. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांइतकाच अनन्यसाधारण महत्त्व असणारा हा विषय मंत्रालय, मंत्री, प्रशासकीय अधिकाऱ्यांची उतरंड, पर्यवेक्षीय यंत्रणा आणि शिक्षक व पालक यांच्या गोंधळलेल्या मानसिकतेचे दुर्दैवी प्रतीक ठरत असताना हेरंब कुलकर्णी या शिक्षण क्षेत्रातील समर्पित शिक्षक कार्यकर्त्याने गेल्या दहा वर्षांत केवळ ‘वंचित आणि शोषितांच्या लेकरांविषयी असलेली अकृत्रिम तळमळ’ या स्वयंप्रेरणेतून शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक समस्येच्या मुळाशी जात केवळ, वस्तुनिष्ठ आणि बळकट आकडेवारीसह प्रभावी मांडणी करत, पदरमोड करत, प्रसंगी शारीरिक आणि मानसिक संकटे अंगावर घेत अनेकांच्या द्वेषाला आणि रोषाला बळी पडत शिक्षण क्षेत्राचा घेतलेला उभा आडवा आणि वास्तवदर्शी छेद म्हणजे त्यांचे ‘माझी शिक्षण परिक्रमा’ हे पुस्तक.

कुठलाही अभिनिवेश न बाळगता राज्यभर भटकंती करून घेतलेल्या भल्याबुऱ्यां अनुभवांची पुराव्यानिशी केलेली नितळ आणि पारदर्शी मांडणी, साधी आणि मनाला भिडणारी सोपी, सहज संवादी भाषाशैली आणि शिक्षण क्षेत्रातील अनुभवलेल्या बहुतांश वाईट, तर थोड्या चांगल्या गोष्टीची त्यांच्यातील कार्यकर्त्याने ललित पद्धतीने केलेली मांडणी हे या पुस्तकाचे बलस्थान.

या परिक्रमेत त्यांच्या सोबत फिरताना शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यां जुन्या व नव्या पिढीतील शिक्षकांची मानसिकता, अधिकारी वर्ग व प्रशासकीय यंत्रणांवर असणारा राजकीय दबाव, या क्षेत्रात सुरू असलेला भ्रष्टाचार, शासकीय पातळीवरील गल्लीपासून दिल्लीपर्यंत समानतेचा, विकासाचा मुखवटा मिरवणारी, परंतु प्रत्यक्षात उदासीन आणि निगरगट्ट असणारी नोकरशाही या नकारात्मक बाबीसोबतच दुर्गम भागात कोणत्याही बक्षिसाची अपेक्षा न करता गरीबांच्या लेकरांना शिकता यावे यासाठी जीवाचे रान करणारी शिक्षक मंडळी, आशेची बेटे ठरणाऱ्या शाळा, प्रशासनात राहूनही संवेदना जिवंत असलेले अधिकारी, मंत्रीमहोदयही भेटतात.

‘‘सर, आयुष्यात फुले, शाहू, आंबेडकर नाही होऊ शकलो, पण पगार घेऊन गरीबांच्या लेकरांचे थोडेफार कल्याण आपल्या हातून होत असेल तर जीव लावून काम करायला काय हरकत आहे ?’’ असे म्हणणारा, अगदी निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेला दुर्गम भागातील शिक्षक जसा भेटतो, तसाच दुर्गम भागात शाळा असल्याने कुणी अधिकारी तपासणीसाठी येत नाही म्हणून 15-15 दिवस शाळाही न उघडणारा तरुण शिक्षकही भेटतो. राज्याच्या शिक्षण सचिव पदावर असूनही शालाबाह्य विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरील उपाययोजना करताना प्रोटोकोल बाजूला ठेवत तळमळीने काम करणाऱ्या सचिव दर्जाच्या अधिकारी भेटतात, त्यासोबतच याच प्रश्नावर केंद्रीय नियोजन आयोगावर अधिकारी पदावर कार्यरत अधिकाऱ्यांची बेफिकिरी आणि उदासीनताही!

‘शालाबाह्य विद्यार्थी शोध मोहीम’ हा लेखकाच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याने साहजिकच या विषयावर लेखक पोटतिडकीने व्यक्त होतो. वीटभट्टय़ा, ऊसतोड कामगार, वेश्यांची मुले, स्थलांतरित कामगारांची मुले अशा सर्वच क्षेत्रांतील मुले शाळाबाह्य राहण्याची कारणे आणि त्यावर उपाययोजना शोधताना लेखकाने वीस जिह्यांत केलेली पायपीट, घेतलेले विदारक अनुभव, गोरगरीब पालकांचे दुःखदैन्य, त्यांच्या समोरील भीषण दारिद्र्य, व्यसने, अंधश्रद्धा या साऱ्यांचा धांडोळा घेताना या एका समस्येला किती भिन्न पदर आहेत हे समजून घेताना वाचक अंतर्मुख होत जातो. या समस्या लेखक फक्त मांडून थांबत नाही, तर त्या सोडवण्यासाठी तन, मन, धनाने प्रयत्न करतो. प्रसंगी टोकाचा संघर्ष करतो आणि सुधारणेची सुरुवात स्वतःपासून करतो.

या परिक्रमेत महाराष्ट्रातील शहरापासून खेड्यापाड्यांत ‘आशेची बेटे’ बनून कार्यरत असणाऱ्यां उपक्रमशील शाळा आणि ध्येयवादी शिक्षकावर त्यांनी विस्ताराने लिहिले आहे. ‘ग्रामीण भागातील शुभवर्तमान’ या प्रकरणात बुलढाण्याच्या ग्राम शिक्षण समित्यांचे सक्षमीकरण, लातूरचा पथदर्शी नंदादीप प्रकल्प, जळगावचा दीपस्तंभ प्रकल्प, राजीव तांबे यांची अनोखी गंमत शाळा, कोल्हापूरचा सृजन आनंद प्रकल्प, पाबलचा विज्ञान आश्रम यावर लिहिताना, ‘‘लाखो रुपये खर्चून एखादी शासकीय योजना जे करू शकत नाही ते या प्रकल्पांनी केवळ प्रामाणिक तळमळीने करून दाखवले आहे’’ अशी कौतुकाची थाप ते सहज देऊन जातात आणि वाचकाला हे प्रकल्प प्रत्यक्ष पाहावेत अशी उत्सुकता निर्माण होते. बाबा आमटे, मेधा पाटकर, यशपाल, अभय बंग या विविध दिग्गजांना आपण त्यांच्या सामाजिक कार्यामुळे ओळखतो, पण त्यांचे शिक्षण क्षेत्रातही आपल्याला ठाऊक नसलेले कार्य या पुस्तकातून जाणून घेता येते.

लेखक म्हणतो, ही उत्तर न सापडलेली प्रश्नयात्रा आहे. कधी इतकी उदासी येते की, या परिक्रमेच्या डोहात स्वतःला संपवावेसे वाटते, पण ही निराशा क्षणिक ठरते. कारण हाडाचा शिक्षक कधीच निराश होऊ शकत नाही, सकारात्मकता हेच त्याचे बलस्थान असते. त्यामुळे एखादा वाडीवस्तीवरील शिक्षक चांगले काम करताना पाहून ही निराशा दूर होते आणि डोईवर दारिद्र्याची भळभळती जखम असलेल्या या देशातील शेवटच्या माणसाच्या भल्यासाठी ही परिक्रमा सुरू राहते…राहावी!